Sunday, June 14, 2026
Latest NewsPUNE

गणेशोत्सवाच्या माध्यमातून तयार होतात सामाजिक कार्यकर्ते- दिलीप वळसे पाटील यांचे मत 

पुणे : गणेशोत्सवाच्या माध्यमातून  हजारो सामाजिक कार्यकर्ते तयार होतात. समाजासाठी आवश्यक कार्य गणेशोत्सव कार्यकर्ते आणि मंडळाच्या माध्यमातून घडत असते. भविष्यात याचे स्वरूप आणखी मोठे होईल त्याला विधायक स्वरूप येईल, असे मत सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केले.
पुणे परिवारच्या वतीने देण्यात येणारा लोकमान्य जीवन गौरव पुरस्कार सूर्यकांत पाठक यांना प्रदान करण्यात आला. स.प. महाविद्यालयाच्या लेडी रमाबाई हॉलमध्ये हा पुरस्कार वितरण सोहळा झाला. यावेळी गणेशोत्सव मंडळाच्या माध्यमातून उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल गणेशोत्सव कार्यकर्त्यांना ‘आदर्श गणेशोत्सव कार्यकर्ता’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

पुरस्कार प्रदान सोहळ्यासाठी  जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, अखिल मंडई मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष हेमंत रासने, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, परिमंडळ १ चे पोलिस उपायुक्त संदिपसिंह गिल्ल, सामाजिक कार्यकर्ते आनंद सराफ, डॉ.मिलिंद भोई, पुणे परिवाराचे अध्यक्ष ॲड. प्रताप परदेशी, विनायक घाटे, शिरीष मोहिते, प्रकाश ढमढेरे, युवराज चिकणे, संदिप चव्हाण यावेळी उपस्थित होते.

दिलीप वळसे पाटील म्हणाले,  गणेशोतसव कार्यकर्त्यांच्या माध्यमातून यापुढे असे सामाजिक कार्य घडत राहील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. पुण्याचा लौकिक जगभर आहे. पुण्याच्या गणेशोत्सवाचे जगामध्ये कुतुहुल आहे. गणेशोत्सव हा केवळ पुण्यापुरता मर्यादित राहिला नाही. जगभर गणेशोत्सव साजरा केला जातो. वेगवेगळे प्रदूषण आज आहेत परंतु आवाजाचे प्रदूषण हे देखील तितकेच त्रासदायक ठरू शकते असेही त्यांनी या वेळेला सांगितले.
चंद्रकांत पाटील म्हणाले, पुरस्काराची अपेक्षा न करता गणेशोत्सव कार्यकर्त्यांनी  काम केले त्याचे फळ कार्यकर्त्यांना मिळाले. यावेळी कार्यकर्त्यांना त्यांनी शुभेच्छा दिल्या.

महेश सूर्यवंशी म्हणाले, गणेशोत्सव कार्यात ज्येष्ठ आणि युवा कार्यकर्ते एकत्र आले तर नियोजनबद्ध काम होऊ शकते. गणेशोत्सवाच्या अतिशय ताणतणावपूर्ण काळात देखील काही गणेशोत्सव मंडळे सामाजिक उपक्रम राबवितात तेव्हा खऱ्या अर्थाने श्रद्धा आणि सेवेचा मिलाप होतो.

सूर्यकांत पाठक म्हणाले, गणेशोत्सवावर कार्यकर्ते आणि मंडळांवर अनेक लोक टीका करतात. टीका करणाऱ्यांनी ती अवश्य करावी परंतु कार्यकर्त्यांच्या चांगल्या कामाचेही कौतुक करावे. यशोत्सव हा वर्षभर ऊर्जा देणारा असतो. शहरात अडचणीच्या वेळी सर्वात आधी धावून जातो तो गणेशोत्सव कार्यकर्ता असतो. बंदी घालून किंवा केवळ टीका करून उपयोग नाही तर उत्सवामध्ये सहभागी होऊन पहायला पाहिजे. असेही त्यांनी यावेळी सांगितले.

खडक सार्वजनिक मित्र मंडळचे ऋषिकेश बालगुडे, श्री शनि मारुती बाल गणेश मंडळचे सचिन पवार, एकता मित्र मंडळ ट्रस्टचे सुधीर ढमाले, सेवा मित्र मंडळचे वैभव वाघ, युगंधर मित्र मंडळचे मयूर पोटे यांना आदर्श गणेशोत्सव कार्यकर्ता पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच तीन वर्षे हजारो गणेश मूर्तींचे विनामूल्य वाटप केल्याबद्दल प्रल्हाद गवळी यांना ‘गणेश सेवा पुरस्काराने’ सन्मानित करण्यात आले. सलीम शेख आणि अक्षय बलकवडे यांचा विशेष सन्मानही यावेळी करण्यात आला. विनायक घाटे यांनी प्रास्ताविक केले. अॅड. प्रताप परदेशी यांनी पाहुण्यांची ओळख करुन दिली. प्रकाश ढमढेरे यांनी आभार मानले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading