fbpx
Tuesday, September 26, 2023
Latest NewsPUNE

डॉ. सलिल कुलकर्णी हे बहुमुखी प्रतिभावंत : प्रा. मिलिंद जोशी


पुणे : कथा हा भारतीय समाजमनात रुजलेला आणि भावविश्व समृद्ध करणारा प्रकार आहे. डॉ. सलिल कुलकर्णी यांना दिग्दर्शक म्हणून राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला असला तरी उत्तम चित्रपट निर्मितीच्या कथेचा हा सन्मान आहे. नाविन्याचा ध्यास घेतलेले डॉ. सलिल कुलकर्णी हे बहुमुखी प्रतिभावंत आहेत, असे गौरवोद्गार महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी काढलेत.
प्रसिद्ध संगीतकार, लेखक डॉ. सलिल कुलकर्णी यांनी दिग्दर्शित केलेल्या ‌‘एकदा काय झालं’ या चित्रपटाला मराठीतील सर्वोकृष्ट राष्ट्रीय चित्रपटाचा पुरस्कार जाहीर झाल्यानिमित्त रंगत-संगत प्रतिष्ठानतर्फे त्यांचा आज (दि. 28) जाहीर सत्कार करण्यात आला. त्या वेळी प्रा. जोशी बोलत होते. पुरस्कार जाहीर झाल्यानंतरचा प्रतिष्ठानतर्फे करण्यात आलेला हा पहिला सत्कार होता. साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त साहित्यिक डॉ. संगीता बर्वे यांची प्रमुख उपस्थिती होती. रंगत प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड. प्रमोद आडकर, कार्याध्यक्ष मैथिली आडकर व्यासपीठावर होते. पुणेरी पगडी, शाल, श्रीफळ आणि सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप होते. सुहृदांच्या उपस्थितीत रंगलेल्या या सोहळ्याने एक वेगळीच उंची गाठली.
प्रा. जोशी पुढे म्हणाले, मुलांच्या भावनिक भरण-पोषणाला पालकांकडून शून्य किंमत दिली जात आहे. आजच्या काळात मुलांशी संवाद साधणे ही खऱ्या अर्थाने महत्त्वाची गोष्ट आहे. संवादासाठी कथा हे प्रभावी माध्यम आहे.
सत्काराला उत्तर देताना डॉ. सलिल कुलकर्णी म्हणाले, आतापर्यंत लेखन, संगीत क्षेत्रातील वाटचालीत सुहृदांकडून मिळालेल्या शुभेच्छा, आशीर्वाद यामुळेच राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कारापर्यंत पोहोचू शकलो. दिग्दर्शक या नात्याने पुरस्कार मिळाला असला तरी पुरस्कारातील अधिकचा वाटा लेखकाचा आहे. कथेचे बीज कसे रुजले यांची ‌‘गोष्ट’ ही त्यांनी उलगडून दाखविली. ते पुढे म्हणाले, आजच्या जमान्यात आक्रोशपूर्ण दाद आवडत असली तरी चांगल्या गोष्टीचा टिकाऊ चित्रपट होऊ शकतो.
डॉ. संगीता बर्वे म्हणाल्या, गाण्यासाठी जगणारा, जगण्यासाठी गाणारा असा सलिल कुलकर्णी आहे. त्यांनी उत्तम दर्जाची गीते महाराष्ट्राला दिली आहेत. मराठी भाषेतील चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला हा खऱ्या अर्थाने सोनियाचा दिवस आहे.
प्रास्ताविकात ॲड. प्रमोद आडकर यांनी डॉ. सलिल कुलकर्णी यांच्याशी असलेले ऋणानुबंध रसिकांसमोर उलगडून दाखविले. मान्यवरांचे स्वागत मैथिली आडकर आणि ॲड. प्रमोद आडकर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कवी उद्धव कानडे यांनी केले.

Leave a Reply

%d bloggers like this: