fbpx
Saturday, September 30, 2023
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

पदयात्रेतून काही गोष्टी शांतपणे सांगितल्या आहेत, सरकारने बोध घ्यावा, उगाच कृती करायला भाग पाडू नका -राज ठाकरे

कोेलाड : आज  ला दिवसभर महाराष्ट्र सैनिक आणि कोकणवासीय कोकण जागर पदयात्रेत सामील झाले, वेगवेगळ्या टप्य्यात त्यांनी पदयात्रा केली आणि मुंबई-गोवा महामार्ग आणि कोकणातील इतर विषयांसाठी जे आंदोलन केलं त्याबद्दल त्या सर्वांचे मनापासून अभिनंदन. खरंतर मी पण पदयात्रेत सहभागी झालो असतो, पण काही महिन्यांपूर्वी माझं ऑपरेशन झालं त्यामुळे इतकं चालण्याची मला अजून परवानगी नाही.  पदयात्रा खरंतर तसा सभ्यमार्ग. पण आपल्या पक्षाचं धोरण आहे की आधी हात जोडून सांगून बघायचं नाही तर हात सोडून सांगायचं आहेच. सरकारला आज पदयात्रेतून काही गोष्टी शांतपणे सांगितल्या आहेत, त्यातून काही सरकारने बोध घ्यावा, उगाच कृती करायला भाग पाडू नका. असा इशारा मनसे अध्यक्ष रआज ठाकरे यांनी दिला. 

राज  ठाकरे म्हणाले, गेली १७ वर्ष हा मुंबई-गोवा महामार्ग रखडला आहे. ह्या काळात ह्या रस्त्यावर २५०० माणसं गेली, गाड्यांचं किती नुकसान झालं असेल त्याची मोजदादच नाही. दरवेळेला खड्डे भरून सगळ्या सरकारांनी वेळ मारून नेली आहे. इथे येताना तर मी एक अजबच प्रकार पाहिला तो म्हणजे ह्या महामार्गावर मध्येच पेव्हरब्लॉक टाकलेत. अहो जगात सर्वत्र रस्ते सिमेंट काँक्रीटचे असतात आणि फुटपाथ पेव्हरब्लॉकचे. इथे सगळं उलटंच. आणि असं तुमच्या आयुष्याशी खेळून पण कोकणी बांधवाला काही वाटत नाही, तो शांत कसा राहू शकतो ? त्याच त्याच लोकांना कसं निवडून देऊ शकतो हे मला कळत नाही. 

१९९५ ला सत्ता आल्यावर बाळासाहेबांनी त्यांचं स्वप्न सांगितलं की, त्यांना मुंबई-पुणे अंतर २ तासांत कापता येईल असा रस्ता हवा आहे. तेंव्हा अनेकांना वाटलं हे कसं शक्य आहे. पण बाळासाहेबांची तीव्र इच्छाशक्ती आणि  नितीन गडकरी ह्यांनी जी धडाडी दाखवली त्यातून हा रस्ता पूर्ण झाला आणि देशाला कळलं की असा काही रस्ता बनू शकतो. पण ज्या राज्याने महामार्गाचा आदर्श दाखवला त्याच राज्यातील एक महामार्ग १७ वर्ष का रखडतो ?  ह्या मागे मला एक षडयंत्र जाणवतंय. आज कोकणातील बांधवांच्या जमिनी स्वस्तात विकत घ्यायच्या आणि पुढे रस्ता चांगला झाला की अव्वाच्या सव्वा भावाने व्यापाऱ्यांना विकायच्या. आणि हे आपलीच लोकं करत आहे. कुंपणच शेत खात असेल तर करायचं काय ? माझी कोकणातील बांधवांना हात जोडून विनंती आहे की जमिनी विकू नका. कितीही आमिषं दाखवली, कितीही दबाव आणला तरी विकू नका. बाकी ह्या व्यापाऱ्यांचे काय करायचं ते आम्ही बघून घेतो. तुम्ही जमीन सोडू नका म्हणजे झालं.

परवा माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी आंदोलन केलं तर माझ्या महाराष्ट्र सैनिकांना, पोलीस स्टेशनमध्ये सरकारने अंडरवेअरवर बसवलं, ह्या सरकारला मला एकच सांगायचं आहे ते मग आधीच असो की आत्ताच, सत्तेचा अमरपट्टा घेऊन कोणी आलेला नसतो, अंडरवेअरची रिटर्न गिफ्ट मी पण देऊ शकतो.  मी पुन्हा एकदा तमाम महाराष्ट्र सैनिकांचे आणि कोकणवासीयांचे आभार मानतो आणि हो, हे आंदोलन संपलेलं नाही, पुढे काय करायचं ते लवकरच सांगेन.

Leave a Reply

%d bloggers like this: