श्रीरामपूरमधील पीडित कुटुंबियांची ॲड. प्रकाश आंबेडकरांनी केली फोनवरून विचारपूस!
मुंबई – अहमदनगर जिल्ह्यातील, श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव येथे काल धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. 3 बौद्ध तरुणांनी कबुतरं, शेळी चोरल्याच्या संशयावरून गावातील धनदांडग्या लोकांनी अमानुषपणे मारहाण केली. त्यातील एका अल्पवयीन मुलाच्या अंगावर लघवी केली, त्याला थुंकी चाटायला लावली, कपडे काढून झाडाला लटकावून बेदम मारहाण केली, व बाहेर कोणाला सांगू नका अन्यथा जीवे मारू अशी धमकी आरोपींनी पीडितांना दिली.
पीडित तरुणांना वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी रुग्णालयात दाखल केले. या घटनेची माहिती मिळताच वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी पीडित तरुणाची फोनवरून विचारपूस करून त्याला धीर दिला. यावेळी पीडित तरुणांच्या आजीशी ही त्यांनी संवाद साधला. व मदतीचे आश्वासन दिले.
यावेळी पीडित महिलेने ॲड. आंबेडकर यांना साद घालून न्याय मिळवून देण्याची विनंती केली. त्यावर १ सप्टेंबर रोजी ते पीडित परिवाराच्या भेटीला येत असल्याचे त्यांनी सांगितले. या सर्व घटनेचा व्हिडीओ ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी ट्विट केला आहे.
“हा जातीय अत्याचारच आहे आणि तो जातीयवादी मानसिकतेतून घडलेला आहे. तीन दलित मुलांना ‘शिक्षा’ देण्याचा अधिकार आपल्याला आहे ही मानसिकता इथल्या जातीय व्यवस्थेनेच जोपासली आहे. इतर कोणाला कबुतर चोरीच्या संशयावरून इतकी अमानुष मारहाण झाली असती ?? निश्चितच नाही”! असेही एक ट्विट करत ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी आपला संताप व्यक्त केला.
श्रीरामपूर, अहमदनगर येथील जातीय अत्याचारातील पीडित घाबरलेले आहेत. त्यांना न्याय हवाय.
— Prakash Ambedkar (@Prksh_Ambedkar) August 27, 2023
मी त्यातल्या एका पीडित मुलाशी आणि त्याच्या आजीसोबत फोनवर बोललो. वंचित बहुजन आघाडी आणि मी स्वतः या प्रकरणात न्याय मिळवून देण्यासाठी सर्व काही करीन हे आश्वासन आजींना दिले आहे. pic.twitter.com/SiunZHFn4X