आयुक्तांनी रस्त्यावर फिरावे म्हणजे खड्डयांमुळे होणारे नागरिकांचे हाल समजतील
मा. स्थायी समिती सदस्या व महिला आघाडी शहराध्यक्षा अर्चना पाटील यांचे आवाहन
पुणे : पुणे शहरात रस्त्यांची अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे. नागरिकांचे खड्ड्यांमुळे हाल सुरू असून अनेक जीवघेणे अपघात घडत असताना प्रशासन सुस्तपणे कारभार करीत आहे. अशी टीका आज भाजपा महिला आघाडीच्या पुणे शहराध्यक्षा अर्चना पाटील यांनी पुणे महानगरपालिका प्रशासनावर केली.
शहरातील खड्डयांच्या प्रश्नासंदर्भात आज महिला आघाडीने आयोजित केलेल्या निषेध आंदोलनात त्या बोलत होत्या.
भाजपचे पुणे शहराध्यक्ष धिरजजी घाटे यांच्या मार्गदर्शनाखाली व महिला आघाडीच्या अध्यक्षा अर्चनाताई पाटील यांच्या नेतृत्वात झालेल्या या आंदोलनाला मा. उपमहापौर सरस्वतीताई शेंडगे, मा. नगरसेविका अर्चना मुसळे, ज्योती कळमकर, मनीषा कदम, राजर्षी शिळीमकर, मंजुश्री खर्डेकर, मंजुषा नागपुरे, स्वाती लोखंडे, उज्वला जंगले, मुक्ता जगताप आणि पदाधिकारी कांचन कुंबरे, आशाताई बिबवे, रेश्मा सय्यद, राणी कांबळे व सर्व महिला सहकारी उपस्थित होत्या.
शहरातील सर्व भागात खड्डयांचे साम्राज्य झाले असताना प्रशासन मात्र सुस्त बसले आहे. नव्या सॉफ्टवेअरचे कारण पुढे करत अनेक रस्ते दुरूस्तीच्या कामांचे वर्क ऑर्डर दोन दोन महीने रखडले आहेत. दुसरीकडे काही ठेकेदारांची तीस- चाळीस टक्के कमी दराने आलेली कंत्राटे मंजूर केली जात आहेत. अशा दर्जाहीन कामांना मंजुरी देऊन प्रशासन नागरीकांच्या जीवाशी खेळत आहे. अशा शब्दांत पाटील यांनी प्रशासनाला धारेवर धरले.