एनएसएफए, विराग क्रिकेट अॅकॅडमी संघांचा दुसरा विजय !!
पुणे : स्पोर्ट्सफिल्ड मॅनेजमेंट तर्फे दुसर्या ‘स्पोर्ट्सफिल्ड मान्सुन लीग’ अजिंक्यपद १४ वर्षाखालील ३०-३० षटकांच्या क्रिकेट स्पर्धेत एनएसएफए, पुणे आणि विराग क्रिकेट अॅकॅडमी या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून दुसरा विजय नोंदविला.
सातारा रोड येथील टेंभेकर फार्मस् क्रिकेट मैदानावर झालेल्या सामन्यात लक्ष्य पटेल याच्या अष्टपैलू खेळीच्या जोरावर एनएसएफए संघाने डिलीजंट क्रिकेट क्लबचा ७५ धावांनी सहज पराभव करून दुसरा विजय मिळवला. पहिल्यांदा फलंदाजी करताना एनएसएफए संघाने १९० धावांचे लक्ष्य उभे केले. यामध्ये लक्ष्य पटेल याने नाबाद ५९ धावांची तर, युवराज सिंग याने नाबाद ६२ धावांची खेळी केली. या दोघांनी चौथ्या गड्यासाठी ८० चेंडूत १३२ धावांची भागिदारी रचली. याला उत्तर देताना डिलीजंट क्रिकेट क्लबचा डाव ११५ धावांवर मर्यादित राहीला.
विराट उत्तेकर याच्या अष्टपैलू खेळीमुळे विराग क्रिकेट अॅकॅडमीने फल्लाह क्रिकेट अॅकॅडमीचा ४ गडी राखून पराभव केला. प्रथम खेळताना फल्लाह क्रिकेट अॅकॅडमीचा डाव ९९ धावांवर अडखळला. विराट संघाच्या नीरज पोकळे (२-१२) आणि विराट उत्तेकर (२-२१) यांनी अचूक गोलंदाजी केली. हे आव्हान विराग क्रिकेट अॅकॅडमीने २२.१ षटकात पूर्ण केले. विराट उत्तेकर याने ३२ धावांची खेळी करून संघाचा विजय सोपा केला.
सामन्याचा संक्षिप्त निकालः गटसाखळी फेरीः
एनएसएफए, पुणेः २६ षटकात ४ गडी बाद १९० धावा (लक्ष्य पटेल नाबाद ५९ (५०, १० चौकार), युवराज सिंग नाबाद ६२ (४१, ११ चौकार, १ षटकार), वरद पवार २-२९);(भागिदारीः चौथ्या गड्यासाठी लक्ष्य आणि युवराज यांच्यात १३२ (८०) वि.वि. डिलीजंट क्रिकेट क्लबः २६ षटकात ८ गडी बाद ११५ धावा (नील अपने ३९, लक्ष्य पटेल २-१६, प्रिन्स् पटेल २-१५); सामनावीरः लक्ष्य पटेल;
फल्लाह क्रिकेट अॅकॅडमीः १५.५ षटकात १० गडी बाद ९९ धावा (अजय यादव ४०, केशव नायक १२, नीरज पोकळे २-१२, विराट उत्तेकर २-२१) पराभूत वि. विराग क्रिकेट अॅकॅडमीः २२.१ षटकात ६ गडी बाद १०० धावा (विराट उत्तेकर ३२, आदित्य थिटे १७, तनय खिंवसरा २-१६, यश कुमार २-२९); सामनावीरः विराट उत्तेकर;