‘चांद्रयान’ मोहिमेचे यश हा देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उत्स्फूर्त भावना
मुख्यमंत्री म्हणतात की, प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटावा असा हा आजचा क्षण आहे… या यशाने सर्व भारतीयांचा ऊर अभिमानाने भरून आला आहे. देशातील सर्व शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ, संशोधकांचं हे यश आहे.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या दिशादर्शक नेतृत्वाचं आणि पाठिंब्याचं बळ शास्त्रज्ञांच्या पाठीशी आहे. श्रीहरीकोटा येथून १४ जुलैला ‘चांद्रयान ३’ हे चंद्राच्या दिशेने झेपावलं. अनेक अवघड टप्पे त्याने यशस्वीपणे पार केले. चांद्रयान ३’ कडून वेळोवेळी पाठवण्यात आलेली छायाचित्रे आणि यानाची सकारात्मक प्रगती ही आजच्या या यशाची ग्वाही देत होते असे सांगून मुख्यमंत्री म्हणतात की, भारतीयांना असलेली यशाची खात्री आणि शास्त्रज्ञांचे कर्तृत्व आणि त्यांच्या बुद्धिमत्तेवरील अढळ विश्वास आज सार्थ ठरला आहे.
परवा रशियाचे ‘लुना-२५’ यान चंद्रावर उतरण्याआधीच कोसळले होते, त्या पार्श्वभूमीवर आज ‘चांद्रयान ३’ चे यश हे संपूर्ण जगात उजळून निघाले आहे असेही मुख्यमंत्री आपल्या प्रतिक्रियेत म्हणतात.
