मी कुठेही आदरणीय शरद पवारसाहेबांवर टीका किंवा काही चुकीचे बोललो नाही – दिलीप वळसे पाटील
मुंबई – कालच्या (रविवार) माझ्या भाषणात मी कुठेही आदरणीय शरद पवारसाहेब यांच्यावर टीका किंवा काही चुकीचे बोललो नाही असा खुलासा सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी ट्वीट करत केला आहे.
एवढा मोठा उत्तुंग नेता असताना महाराष्ट्राच्या जनतेने त्यांच्या पाठीशी उभे रहायला हवे होते. ते घडले नाही त्याबद्दलची खंत काल दिलीप वळसे पाटील यांनी बोलून दाखवली. ही खंत केवळ कालच (रविवार) बोलून दाखवली असे नाही. यापूर्वीही पक्षाच्या अनेक बैठकांमध्ये तसेच मेळाव्यांमध्ये जाहीरपणे बोललो आहे असेही दिलीप वळसे पाटील यांनी स्पष्ट केले.
आदरणीय पवारसाहेबांबद्दल कुठलीही टीका तसेच चुकीचा शब्द जाणे शक्य नाही. तरीसुद्धा हा जो गैरसमज निर्माण झालेला आहे त्याबद्दल दिलीप वळसे पाटील यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे.
जे राजकीय विश्लेषण कालच्या (रविवार) भाषणातून कार्यकर्ते व जनतेसमोर मांडले होते, त्याचा प्रसारमाध्यमांनी अर्थ समजून न घेता हा विषय चुकीच्या पद्धतीने दाखवला आहे असेही दिलीप वळसे पाटील यांनी म्हटले आहे.
