पशुवैद्यकीय व्यवसायिक समस्या व अडचणी भविष्यकाळात सोडविण्यासाठी कायमस्वरूपी तत्पर असणार – राहुल कुल
पुणे : पशुवैद्यकीय ,पशुसंवर्धन दुग्धव्यवसाय व्यवस्थापन सेवा संघाच्या वतीने पदविकाधारक पशुवैद्यकीय व्यावसायिकांचा राज्यस्तरीय मेळाव्याचे आयोजन पुण्यातील नवी पेठ मधील निवारा सभागृह येथे करण्यात आले. संपूर्ण राज्यभरातून या मेळाव्यासाठी पदविकाधारक पशुवैद्यकीय व्यावसायिक उपस्थित राहिले. पदविकाधारक पशुवैद्यकीय व्यावसायिकांना सद्यस्थितीत अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असून त्या शासन दरबारी पोहचवणे हा प्रमुख उद्देश आहे. दुधाचे दर असतील किंवा गायीच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या तरी पशुवैद्यकीय व्यावसायिक यांच्या समस्या आज देखील तशाच आहेत, असा सुर या मेळाव्यात निघाला.
याप्रसंगी कार्यक्रमाला दौंड विधानसभा मतदारसंघाचे आमदार राहुल कुल, डॉ. नारायण जोशी ,डॉ. सुकुमार कुलकर्णी, डॉ.सागर आरुटे,डॉ.विकास वाव्हळ, डॉ.निवृत्ती पोखरकर, डॉ.विजय कबाडे डॉ. वैभव पाटील डॉ.आप्पासो पाटील व राज्यभरातून मोठ्या प्रमाणात पशुवैद्यकीय व्यवसायिक उपस्थित होते.
यावेळी आमदार राहुल कुल म्हणाले, पशुवैद्यकीय व्यवसायिक समस्या व अडचणी भविष्यकाळात सोडविण्यासाठी आम्ही कायमस्वरूपी तत्पर असणार आहोत. पदविकाधारक पशुवैद्यकीय व्यवसायिक यांचेसाठी दुय्यम पशुवैद्यकीय परिषद स्थापन करण्यासाठी येत्या डिसेंबर महिन्यात होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात हे कायद्याचे प्रारुप विधीमंडळात मी स्वतः मांडेल. नवीन १२वी विज्ञान नंतर तिन वर्षांचा डिप्लोमा इन व्हेटेनरी सायन्स लवकरात लवकर म्हाफसु विद्यापीठ नागपूर मार्फत लवकर सुरू करण्याबाबत मंत्री महोदयांकडे पाठपुरावा करु. पशुसंवर्धन विभागातील सुधारीत पशुवैद्यकीय नियमणाची अधिसूचना तयार करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच इतर संवर्गातील प्रश्न सोडविण्यासाठी योग्य प्रकारे सहकार्य करुन निर्णय घेण्यास राज्य शासनाकडे पाठपुरावा करु असेही त्यांनी सांगितले.
याप्रसंगी बोलताना डॉ.नारायण जोशी म्हणाले की पशुवैद्यकीय व्यवसायिक यांच्या समस्या अनेक असून सरकारकडे पाठपुरावा करून काही समस्या सुटल्या असल्या तरी अनेक समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी कायमस्वरूपी प्रयत्न करणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
