लिटिल इटली समूहाच्या गॉरमेट ग्रोसरी ब्रँड अकासाचा पुण्यात उत्पादन प्रकल्प सुरू
पुणे : लिटिल इटली समूहाने आपल्या अकासा या ब्रँड अंतर्गत खास इटालियन खाद्यपदार्थ उपलब्ध करण्याकरिता पुण्यात आपला पहिला कारखाना सुरू केला आहे. ग्राहकांना घरच्या घरी रेस्टॉरंटप्रमाणे इटालियन पदार्थ तयार करता येतील असे पदार्थ अकासा या ब्रँड अंतर्गत तयार केले जातात. यामध्ये डू इट युवरसेल्फ किट्स, विशेष प्रकारचे सॉस, चीज, पास्त्याचे विविध प्रकार आणि इतर विशेष उत्पादनांचा समावेश आहे.
अकासा ब्रँड अंतर्गत २०२० मध्ये अशी खास उत्पादने दाखल करण्यात आली. आता पुण्यातील या अत्याधुनिक कारखान्यात ही सर्व उत्पादने तयार करण्यात येणार आहेत. हा प्रकल्प २५ हजार चौरस फूट जागेवर पसरला असून, येथे चीज, पास्ता, सॉस आणि बेकरी उत्पादने अशा चार मुख्य उत्पादन आहेत. प्रत्येक उत्पादन लाइन वेगवान पद्धतीने दर्जेदार उत्पादनांची श्रेणी तयार करण्यासाठी डिझाइन केलेली आहे.
लिटल इटली १९९० च्या दशकाच्या सुरुवातीपासून त्यांच्या रेस्टॉरंट्ससाठी स्वतः चीज तयार करत आहे. परंतु गॉरमेट चीजची वाढती मागणी आणि चीजचा वाढता वापर पाहता, आकासाने मोझरेला, बुर्राटा, गौडा, गोट्स चीज, चेडर, रिकोटा, बोकोचिनी आदी प्रकारांचा समावेश असलेली एक मोठी श्रेणी तयार करण्याचा निर्णय घेतला. चीज उत्पादनांबरोबरच अकासाचे आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण उत्पादन म्हणजे पास्ता. रॅव्हिओली, टॉर्टेलिनी, कॅपेलेट्टी, लसाग्ने, न्योकी आणि इतर अनेक प्रकारचे पास्ता उपलब्ध केले जातात. भारतीय बाजारपेठेत हे पास्ता लोकप्रिय ठरले आहेत. ताजा कच्च्या स्वरूपातील पास्ता भारतीय रिटेल बाजारात सहज उपलब्ध होत नाही. त्यामुळे असे सर्व प्रकार ग्राहकांना सहज उपलब्ध करून देण्यासाठी अकासा सज्ज आहे. या प्रकल्पात साल्सासारखे विविध प्रकारचे सॉस, फ्लेवर्ड तेल, विविध प्रकारचे डिप्स, ब्रेड, बेकरी उत्पादनेही तयार करण्यात येणार आहेत. या प्रकल्पामुळे कंपनीला अनेक नवी उत्पादने आणण्यात आणि वितरण जाळ्याचा विस्तार करून देशात आणि परदेशातील अधिकाधिक ग्राहकांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल.
अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज अशा या प्रकल्पात विशेष इटालियन मशीन्स आहेत. ज्याद्वारे उच्च दर्जाची उत्पादने कार्यक्षमतेने तयार केली जातात. त्यांची नैसर्गिक चव टिकवून ठेवली जाते आणि प्रिझर्व्हेटिव्हजचा वापर न करता देखील त्यांचे शेल्फ लाइफ राखली जाते. या क्षेत्रातील शास्त्रज्ञांच्या देखरेखीखाली विज्ञानाच्या तत्त्वांचा वापर करून
नियंत्रित प्रक्रियांचे पालन करून ही उत्पादने तयार केली जातात. उत्पादनांचे तापमान, पीएच पातळी आणि विशिष्ट पॅकिंग तंत्राचा वापर करून उत्पादनांचे शेल्फ लाइफ वाढवले जाते.
“या उत्पादन प्रकल्पामुळे आम्ही आमच्या ग्राहकांना इटलीतील खाद्यसंस्कृतीचा आस्वाद घेण्याचा आनंद देऊ शकणार आहोत. आम्ही इटालियन पाककृतीबद्दलचे आमचे प्रेम, ते तयार करण्यातील कौशल्य देशातील खाद्यप्रेमींसोबत सामायिक करण्याचे आमचे स्वप्न पूर्ण करण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. आम्ही ग्राहकांना त्यांच्या पैशाचे उत्तम मूल्य देणारे पदार्थ उपलब्ध करून देण्यासाठी कटिबध्द आहोत,” असे लिटिल इटली समूहाचे व्यवस्थापकीय संचालक अमृत मेहता यांनी सांगितले.
“एक ब्रँड म्हणून आम्ही भारतीय बाजारपेठेसाठी नवनवीन आणि अनोखी उत्पादने तयार करण्याचा प्रयत्न करत आहोत. या पुढची पायरी म्हणजे ट्रफल उत्पादनांची श्रेणी आणि शाकाहारी उत्पादनांची श्रेणी सादर करणे, ही आहे,” असे लिटिल इटली समूहाचे अध्यक्ष राज मेहता म्हणाले. “परफेक्शनची आमची आवड आम्हाला तुमच्या स्वयंपाकघरात इटलीचा छोटासा अवतार प्रत्यक्षात आणण्याची प्रेरणा देते. उत्कृष्ट चवीसह सुंदर आठवणी तयार करते.” असेही मेहता यांनी नमूद केले.
अमृत मेहता यांच्या कल्पनेतून अकासा हा ब्रँड लॉकडाउन दरम्यान दाखल करण्यात आला. इटालियन पदार्थांचे डू इट युवर सेल्फ होम किट्स दाखल करणारा हा देशातील पहिला ब्रँड आहे. अकासाने सॉस, चीज आणि पास्ता यांच्या उत्पादन श्रेणीचा लक्षणीय विस्तार केला आहे. मागील आर्थिक वर्षात अकासाने १.२ कोटी रुपयांचा महसूल मिळवला. चालू आर्थिक वर्षात तीन कोटी रुपयांचा महसूल मिळवण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे.
सर्वांसाठी ताजी, उच्च दर्जाची उत्पादने सहज उपलब्ध करून देत, इटालियन पदार्थही घरच्याघरी बनवण्याची प्रक्रिया सुलभ आणि आनंददायी करणे हे या ब्रँडचे उद्दिष्ट आहे. अकासाने आपली उत्पादने किफायतशीर किमतीत उपलब्ध करून दिली आहेत. ही उत्पादने २०० रुपये ते १००० रुपयांपर्यंतच्या पट्ट्यात आहेत. भारतीय एफएमसीजी बाजारपेठेत कंपनीने पास्ताची मोठी श्रेणी उपलब्ध केली आहे. दोराबजी, फाइन फूड, आणि डेली इसेंन्शियल्स या स्टोअर्समध्ये ही उत्पादने उपलब्ध आहेत.
लिटिल इटली समूहाने गेल्या आर्थिक वर्षात ८२.७ कोटी रुपयांचा महसूल मिळवला होता. चालू आर्थिक वर्षात १०० कोटी रुपये महसूल मिळण्याची अपेक्षा आहे. लिटिल इटली समूह गेल्या तीन दशकांपासून भारतात इटालियन खाद्यसंस्कृतीचा प्रसार करत आहे. तीन देशांमधील १६ शहरांमध्ये १०० दालने असा या समूहाचा विस्तार आहे.
