आगामी निवडणुकांसाठी काँग्रेस पक्षाची सोशल मिडीया टिम सज्ज.
पुणे : काँग्रेस नेते राहुलजी गांधी यांनी भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून समाजातील विविध स्तरातील लोकांना जोडून देशामध्ये भाजपच्या लोकशाही विरोधी धोरणांना वाचा फोडण्याचे काम केले आहे. आगामी निवडणुकांमध्ये याच धरतीवर काँग्रेस पक्षाच्या सोशल मिडीया टिम कडून मोदी सरकारची जनविरोधी धोरणे व काँग्रेस पक्षाची लोकशाहीचे रक्षण करण्याची भूमिका सोशल मिडियाद्वारे जनतेपर्यंत पोहचवली जाईल, असे मत पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अरविंद शिंदे यांनी व्यक्त केले.
पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने पुणे शहरातील काँग्रेस पक्षाच्या ब्लॉक मधील पदाधिकाऱ्यांसाठी काँग्रेस भवन येथे एक दिवसीय सोशल मिडीया प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आले होते. यावेळी फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम, यु ट्यूब आदी सोशल मिडीया प्लॅटफॉर्मस् बद्दल सोशल मिडीया तज्ञ रोहन फडके व रूद्रेश कौल यांनी प्रशिक्षण दिले. तसेच सोशल मिडीयावर व्यक्त होताना कायदेशिर बाबींची कशी काळजी घ्यावी याबद्दलही मार्गदर्शन करण्यात आले.
सोशल मिडिया राज्य समन्वयक चैतन्य पुरंदरे यांनी पक्षाच्या विविध सोशल मिडीया प्लॅटफॉर्मची माहिती दिली. यावेळी पुणे शहर काँग्रेस तर्फे राहुल गांधी यांनी दिलेल्या ‘‘डरो मत’’ या स्टिकरचे अनावरण करण्यात आले. यावेळी पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष अजीत दरेकर, संगीता तिवारी, सोशल मिडीया शहर अध्यक्ष गुलामहुसेन खान, सोशल मिडीया प्रदेश उपाध्यक्ष युवराज मदगे, विशाल गुंड, हनुमंत पवार, रॉर्बट डेव्हिड, अनिकेत भंडारी, मयुरेश गायकवाड, चेतन पडवळ, नईम पठाण, संकेत साळुंके, अमित कांबळे, संजय मानकर, रजिया बल्लारी आदी उपस्थित होते. या शिबीरात सुमारे १०० पदाधिकाऱ्यांनी सहभाग घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चैतन्य पुरंदरे यांनी केले तर आभार सिमा महाडिक यांनी मानले.
