११ आणि १२ ऑगस्ट रोजी ‘इंटरनॅशनल शॉर्टस कलेक्टिव्ह २०२३’ चे आयोजन
पुणे : जर्मनी, फ्रांस, स्वित्झर्लंड आणि भारत या देशांमधील चित्रपट समीक्षकांच्या कौतुकास पात्र ठरलेले लघुपट पाहण्याची संधी येत्या ११ व १२ ऑगस्ट रोजी पुणेकर चित्रपट रसिकांना मिळणार आहे. निमित्त आहे ग्योथं इन्स्टिट्यूट, मॅक्स म्युलर भवन, अलियॉस फ्रॉसेस दे पुणे, कॉन्स्युलेट जनरल ऑफ स्वित्झर्लंड इन मुंबई, पुणे फिल्म फाउंडेशन आणि आरभाट फिल्म क्लब यांच्या वतीने आणि रेनबो अम्ब्रेला फाउंडेशन यांच्या सहकार्याने आयोजित पाचव्या ‘इंटरनॅशनल शॉर्टस कलेक्टिव्ह २०२३’ या लघुपट महोत्सवाचे.

एरंडवणे येथील द बेस या ठिकाणी दोन्ही दिवशी सायं ५ ते ९ दरम्यान सदर लघुपट महोत्सव संपन्न होणार आहे. महोत्सव सर्वांसाठी विनामूल्य खुला असून त्यासाठी प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर प्रवेश देण्यात येईल. यासाठी आगावू नोंदणी करणे आवश्यक असून इच्छुकांना https://rb.gy/22wl7 या संकेतस्थळावर ती करता येणार आहे.
या महोत्सवामध्ये दाखविण्यात येणारे जर्मन भाषेतील चित्रपट हे शॉर्ट एक्स्पोर्ट २०२३ यामधून निवडलेले लघुपट आहेत. तर फ्रेंच, स्विस आणि भारतीय लघुपटांद्वारे कलात्मक कथानकासोबतच मानवी अनुभवांचे अंतरंग दाखविणारे लघुपटांचा आस्वाद रसिकांना घेता येणार आहे. लोकार्नो चित्रपट महोत्सव, भारताचे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि जगभरातील इतर प्रमुख चित्रपट महोत्सवामधून या लघुपटांची निवड करण्यात आली आहे हे विशेष.
