Monday, May 25, 2026
Latest NewsPUNE

पोवाड्यातून महापुरुषांचा इतिहास जागतिक स्तरावर पोहचवू ज्येष्ठ वेणू वादक पं. केशव गिंडे यांचे मत

पुणे ः आज भारतीय संस्कृतीतील अनेक इतरांना वाचता येण्यासाठी साहित्य इंग्रजीत लिपीत लिहिले आहे. भगवत गीतेतील श्लोक इंग्रजी लिपीत लिहिल्यामुळे जसेच्या तसे श्लोक वाचताना परदेशी नागरिकांना मी पाहिले आहे. असेच पोवाडे देखील इंग्रजी लिपीत लिहिले पाहिजेत. त्यामुळे आपल्या देशातील महान पुरूषांचा इतिहास आपण जागतिक स्तरावर पोहचवू शकतो, असे मत ज्येष्ठ वेणूवादक पं. केशव गिंडे यांनी व्यक्त केले.

शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनी आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्यावतीने निरंतर पोवाडा प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले. या वर्गाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. शनिवार पेठेतील न्यू इंग्लिश स्कूल रमणबागेच्या कलाग्राम येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डेक्कन एज्युकेशन सोसायटी नियामक मंडळाचे सदस्य मिलिंद कांबळे, प्रबोधिनीचे अध्यक्ष आचार्य शाहीर हेमंत मावळे, होनराज मावळे, अक्षदा इनामदार, अरुणकुमार बाभूळगावकर  आदी उपस्थित होते.

पं. केशव गिंडे म्हणाले, पोवाडे इंग्रजी लिपीत लिहिल्यामुळे इंग्रजी माध्यमातील मुले देखील ते उत्तमरित्या वाचू शकतील. मग त्या मुलांच्या माध्यमातून आपली संस्कृती, महापुरूषांचा इतिहास जागतिक स्तरावर पोहचवू शकतो, असेही त्यांनी सांगितले.

शाहीर हेमंत मावळे म्हणाले, आजच्या पिढीतील मुलांना चांगले संस्कार नाही म्हणून आपण नेहमी त्यांना बोलत असतो. परंतु त्यांच्यावर चांगले संस्कार करण्यासाठी आपल्याकडे काय चांगले आहे ते आपण त्यांना दिले पाहिजे याचा विचार आपण करत नाही.

कलेचे चांगले संस्कार पुढच्या पिढीला द्यावेत यासाठी गेली २६ वर्षे विनामूल्य पोवाडा प्रशिक्षण मी देत आहे. त्यामुळे पुढील पिढीला आपली संस्कृती समजेल आणि कलेकडे बघण्याचा त्यांचा दृष्टीकोन देखील बदललेल, असेही त्यांनी सांगितले.

यावेळी मिलींद कांबळे यांनी देखील मुलांना मार्गदर्शन केले व संस्थेच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. होनराज मावळे यांनी सूत्रसंचालन केले. हेमंत मावळे यांनी प्रास्ताविक केले, अरुणकुमार बाभूळगावकर यांनी आभार मानले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading