शिंदेंना बाजूला करुन अजित पवारांना मुख्यमंत्री करतील – पृथ्वीराज चव्हाण
कराड : अजित पवार यांना मुख्यमंत्री पदाची ऑफर आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बाजूला करतील आणि पुढे अजित पवार यांना मुख्यमंत्री करतील, अशी माझी माहिती आहे. असा गौप्यस्फोट माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी आज केला.
ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे अभिवादन करण्यासाठी येत आहेत. त्या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे प्रीतिसंगमावर दाखल झाले आहेत. त्यादरम्यान त्यांनी पत्रकारांशी बोलताना हे वक्तव्य केले आहे.
राष्ट्रवादीतून फुटलेला जो गट आहे तो ईडी गट आहे, अशी टीकाही चव्हाण यांनी केलीये. ते म्हणाले, फुटलेल्या प्रत्येकावर ईडीच्या कारवाईची टांगती तलवार आहे. घोटाळ्यांचे आरोप आहेत. आपल्याला चांगली झोप यावी, या उद्देशाने त्यांनी पक्षांतर केलेले आहे. गट फोडलेला आहे. भाजपनेही त्यांना मंत्रिपदे बहाल केली आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
