गुरुपौर्णिमा : श्री त्रिशुंड गणपतीसह मंदिराच्या तळघरातील समाधीचे भाविकांनी घेतले दर्शन
पुणे : सोमवार पेठेतील 17व्या शतकातील ऐतिहासिक श्री त्रिशुंड गणपतीचे तसेच मंदिराच्या तळघरातील दलपतीगिरी गोसावी यांच्या समाधीचे आज (दि. 3) असंख्य भाविकांनी दर्शन घेतले. गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून वर्षातून केवळ एकच दिवस हे तळघर खुले करण्यात येते. त्यानुसार आज सकाळी 8 वाजता हे तळघर भाविकांसाठी खुले करण्यात आले. श्री त्रिशुंड मयुरेश्वर गणपती विजय मंडळ ट्रस्टच्या कार्यकर्त्यांनी भाविकांच्या दर्शनासाठी चोख व्यवस्था केली होती.
पुणे शहरात अनेक प्राचिन मंदिरे आहेत, परंतु अप्रसिद्ध असलेल्या त्रिशुंड गणेश मंदिराची वास्तुशैली पुण्यातील मंदिरांपेक्षा वैशिष्ट्यपूर्ण आहे. वेरूळच्या कोरीव लेण्यासदृश्य असणारे हे मंदिर आहे. त्रिशुंड गणेशाची मूर्ती महाराष्ट्रात क्वचितच आढळते. या मंदिराच्या निर्मितीमागे शिवमंदिराची कल्पना असल्यामुळे या मंदिराची शैली शिवमंदिराप्रमाणे आहे. या मंदिरासंदर्भातील ऐतिहासिक नोंदीनुसार इंदूरजवळ असलेल्या धामपूर येथील संपन्न गोसावी भीमगिरजी यांनी 26 ऑगस्ट 1754 मध्ये या मंदिराचे बांधकाम केले. तळघरात पाण्याचा जिवंत झरा आहे. ऐतिहासिक श्री त्रिशुंड गणपती मंदिराचा इतिहास सर्वसामान्यांना समजण्यासाठी ‘गूढ त्रिशुंड गणेशाचे‘ या सुबक सचित्र पुस्तकाची निर्मिती करण्यात आली असून हे पुस्तक आज श्रींच्या चरणी अर्पण करण्यात आले.
