‘प्राणी, पक्षी यांचे ऋतूबदलातील अनुकूलन’ विषयावर अनोखे चित्रप्रदर्शन
पुणे : गुरुतत्त्वयोग सार्वजनिक धर्मार्थ विश्वस्त संस्थेत गुरुपौर्णिमेनिमित्त ‘प्राणी, पक्षी यांचे ऋतूबदलातील अनुकूलन‘ या विषयावर अनोखे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. गुरुतत्त्व हे फक्त मानावापुरते मर्यादित नसून ते सर्व निसर्गाचे कसे मार्गदर्शक तत्त्व आहे, याचा उलगडा या प्रदर्शनातून पहायला मिळतो.
गुरुपौर्णिमेनिमित्त आज संस्थेच्या ध्यानमंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. गुरुतत्त्वयोग प्रणालीचे प्रणेते अभयकुमार सरदार यांची प्रमुख उपस्थिती होती. गुरुतत्त्ववेध स्मरणिकेचे प्रकाशन अभयकुमार सरदार आणि तेजा दिवाण, राजश्री करे, संजय मानकर यांच्या हस्ते करण्यात आले.
गुरुतत्त्वयोगाच्या अभ्यासासाठी आणि त्याच्या साधनेसाठी योग्य वातावरण निर्माण करून देणे आणि हे तत्त्वज्ञान जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवणे हे गुरुतत्त्वयोग सार्वजनिक धर्मार्थ विश्वस्त संस्थेचे ध्येय आहे. अनेक साधक अभ्यास करत असतात आणि गुरुपौर्णिमेनिमित्त आपल्या अनुभूती आणि विचार इतर साधकांसमोर सादर करतात. आज राजश्री करे, उमा शिंदे, योगिता कामटे आणि प्रचिती पाध्ये यांनी अनुभव कथन केले.
गुरुतत्त्वयोग ही एक सहज, नैसर्गिक जीवनप्रणाली आहे. निसर्गातील सर्व जीवजंतू सहजतेने गुरुतत्त्वाचे मार्गदर्शन स्वीकारतात. त्यामुळे त्यांच्याकडून मानव खूप काही शिकू शकतो. निसर्गातील अश्या अनेक गोष्टी संस्थेच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न असतो. प्राणी, पक्ष्यांनी तीव्र ऋतूबदलात जगण्यासाठी केलेले अनुकूलन हा यंदाच्या प्रदर्शनाचा विषय आहे.
मानव थंडीपासून, उन्हापासून बचावासाठी आपल्या आजूबाजूच्या स्थानात बदल घडवून आणतो; परंतु प्राणी, पक्षी स्वतःमध्ये आमूलाग्र आंतरिक बदल घडवतात. अनेक प्राणी थंडीमध्ये शीतनिद्रा घेतात आणि त्यासाठी चरबीच्या साठ्यावर अनेक महिने जगतात. पक्षी जेव्हा अनेक मैल न थांबता, न झोपता स्थलांतरित होतात तेव्हा पचनक्रियेसारख्या अनेक प्रक्रिया बंद करू शकतात आणि मुक्कामी पोहोचल्या नंतर पुन्हा पूर्वपदावर आणतात. अशा अनेक आश्चर्यकारक गोष्टी निसर्गात होत असतात. कोणत्याही औपचारिक शिक्षणाशिवाय आणि सहजतेने हे घडते. त्यात पर्यावरणाला हानी पोहोचत नाही. अशा वागणुकीचे मार्गदर्शन ते गुरुतत्त्वाकडून मिळवतात. कारण गुरुतत्त्व हे फक्त मानावापुरते मर्यादित नसून ते संपूर्ण निसर्गाचे मार्गदर्शक तत्त्व आहे, हे या प्रदर्शनातून मांडण्यात आले आहे.
आज या प्रक्रियांचा अभ्यास करून वैज्ञानिक वैद्यक शास्त्रातील काही प्रश्न सोडवायचा प्रयत्न करत आहेत. त्या निसर्गातील जिवांची सहजता आपण गुरुतत्त्वयोग तत्त्वज्ञानाच्या अभ्यासाद्वारे आणि शरणागत साधनेद्वारे मिळवू शकतो आणि त्या गुरुतत्त्वाचे मार्गदर्शन आपल्यालाही मिळून आपले आयुष्य सुखी समाधानी होऊ शकते, अशी गुरुतत्त्वयोग तत्त्वप्रणालीची धारणा आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेच्या विश्वस्त तेजा दिवाण यांनी केले.
