किस्मत आर्ट गॅलरी येथे टोंगजी फिलिप कियान यांचे “अनव्हेलिंग सेरेंडिपिटी” प्रदर्शन
किस्मत आर्ट आणि कॉस्मिक हार्ट गॅलरी यांच्या संयुक्त विद्यमाने मिक्स मीडिया कलाकार टोंगजी फिलिप कियान यांच्या कलाकृतींचे प्रदर्शन दि २८ जून ते १५ ऑगस्ट २०२३ या कालावधीत किस्मत आर्ट गॅलरी, ११, देना बँक बिल्डिंग, ३ री पास्ता लेन, कुलाबा मार्केट, मुंबई येथे आयोजित करण्यात आले आहे.
टोंगजी फिलिप कियान हे मूळचे शांघाय, चीन येथील असून ते सध्या न्यूयॉर्क इथे राहतात आणि काम करतात. कियान यांनी ऱ्होड आइसलँड कॉलेज ऑफ आर्टस् अँड डिझाईन येथून फाईन आर्टमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी अनेक आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात सहभाग घेतला आहे.
“अनव्हेलिंग सेरेंडिपिटी” या प्रदर्शनात टोंगजी कियान यांच्या प्रामुख्याने वुडब्लॉक प्रिंट्स कलाकृती रसिकांना पाहता येतील. वुडब्लॉक प्रिंट्स या कठीण माध्यमातून टोंगजी यांनी प्रत्यक्ष सौन्दर्य कोरले आहे. सेरेंडिपिटी म्हणजे अनपेक्षितपणे मिळालेला लाभ. कुठलाही हेतू न ठेवता काम करताना लाकडातून निर्माण झालेले सौन्दर्य हा एक अनपेक्षित लाभच आहे. जो रसिकांना विचारप्रवृत्त करतो आणि मंत्रमुग्ध करतो. या माध्यमात कलात्मक अभिव्यक्ती साकारताना टोंगजी कला रसिकांना अशा जगात घेऊन जातात जिथे फक्त कलात्मक सुसंवाद गाढतो. या कलाकृतींचा प्रत्येक भाग टोंगजी कियान यांचं कला समर्पण दर्शवतो.
विलक्षण आकारांचा वापर, त्रिमितीय कंपोझिशनमधून सौन्दर्यनिर्मिती, रेषांची नाट्यमय लयबद्धता हे टोंगजी यांच्या प्रस्तुत प्रदर्शनातील कलाकृतींचे वैशिष्ट्य आहे.
आंतरराष्ट्रीय कला जगतात घडणाऱ्या घडामोडी आणि आंतरराष्ट्रीय कलाकाराची विचार करण्याची पद्धत जाणून घेण्याची संधी हे प्रदर्शन कला रसिकांना देत आहेत. त्यामुळे कला रसिकांनी चुकवू नये असे आवाहन केसांत आर्ट गॅलरीचे संचालक आणि संयोजक विनोद सोळंकी यांनी केले आहे.
प्रदर्शनाविषयी अधिक माहितीसाठी, वेळ आणि संपर्क तपशीलांसह, कृपया किस्मत आर्ट गॅलरी वेबसाइटला भेट द्या किंवा +91 99679 31825 वर संपर्क साधा.
