पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने ‘मनाचे सॅनिटायझेशन ताण-तणाव “फ्री” कार्यशाळा संपन्न
पुणे : दिवसेंदिवस वाढत जाणारा मानसिक ताण तणाव, राग, चिंता, काळजी अशा भावना, समस्यांना पत्रकारांना दररोजच सामोरे जावे लागते. ताण कमी करणे किंवा निरोगी मानसिक आरोग्यासाठी पुणे श्रमिक पत्रकार संघ आणि एमपॉवर माईंड सेट ट्रान्सफॉर्मेशन अकॅडमीतर्फे खास मनाचे सॅनिटायझेशन हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात मानसिकता परिवर्तन प्रशिक्षक पंकज भडागे यांनी मार्गदर्शन केले.
पुणे श्रमिक पत्रकार संघाच्यावतीने सदस्यांसाठी मनाचे सॅनिटायझेशन” या विषयावर कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी अध्यक्ष स्वप्नील बापट, सरचिटणीस पांडुरंग सरोदे उपस्थित होते. या कार्यशाळेला पुणे श्रमिक पत्रकार संघाचे पदाधिकारी, सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
‘मनाचे सॅनिटायझेशन ताण-तणाव “फ्री”, आनंदी जगण्यासाठी “मानसिक आरोग्य” या कार्यक्रमात पत्रकारांना मार्गदर्शन करताना पंकज भडागे म्हणाले, “अलीकडच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येकाला स्वतःकडून काहीना काही अपेक्षा आहेत. मात्र, त्या सगळ्याच अपेक्षा पूर्ण होतातच असे नाही. उलट त्या पूर्ण होतील की नाही? हा विचार करण्यातच आपला जास्त वेळ जातो. ‘चांगला विचार कर सगळं चांगल घडेल’, असे आपल्या घरातील आई – वडील, आजी-आजोबा सांगतात. मात्र आपण त्याकडे फारस लक्ष देत नाही, अन् नैराश्यात जातो. खरतर आपल्या यश – अपयशात आपल्या विचारांच्या शक्तीचा मोठा वाटा असतो. हे लक्षात घेणे महत्वाचे आहे.”
पत्रकार आपल्या कामाच्या निमित्ताने समाजातील वोविधा प्रश्नांचा मागोवा घेतात, त्यांनी आपल्या लेखणीतून अनेक समस्या सोडवल्या आहेत. मात्र त्यांच्या धावपळीच्या जीवनात अनेकदा त्यांना आपल्या मनाचे सॅनिटायझेशन करायला वेळ मिळत नाही हे वास्तव आहे. यामुळे पत्रकारांनी सातत्याने सकारात्मक विचारातून आपल्या कामाकडे पहावे असे आवाहन पंकज भडागे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर जे बंड्या यांनी केले.
