Monday, June 15, 2026
Latest NewsSports

जागतिक १७ वर्षाखालील स्नुकर अजिंक्यपद २०२३ स्पर्धेत पुण्यातील आरव संचेती याची निवड !!

पुणे : आंतरराष्ट्रीय बिलीयर्डस् आणि स्नुकर फेडरेशन (आयबीएसएफ) जागतिक १७ वर्षाखालील स्नुकर अजिंक्यपद २०२३ स्पर्धेसाठी पुण्यातील आरव सचिन संचेती याची निवड झाली आहे. जागतिक स्पर्धेसाठी निवड झालेल्या १२ वर्षीय आरव हा सर्वात लहान वयाचा खेळाडू असून स्पर्धेमध्ये सहभागी होणार्‍या भारतीय संघाचे प्रतिनिधीत्व करणार आहे.

आयबीएसएफ जागतिक १७ वर्षाखालील स्नुकर अजिंक्यपद २०२३ स्पर्धा रियाध, सौदी अरेबिया येथे ७ ते १६ जुलै २०२३ या कालावधीमध्ये होणार आहे. या स्पर्धेसाठी भारतीय संघातून मयुर गर्ग, आरव संचेती, जाबेझ नवीन कुमार, मयांक कार्तिक, एस. लक्ष्मी नारायण, ए. अब्दुल सैफ, शाम ऑल्विन, हेरीक डेरीन यांची निवड करण्यात आली आहे. या सर्वांमध्ये १२ वर्षाचा आरव हा सर्वात लहान खेळाडू ठरला आहे.

ऑक्टोबर २०२२ मध्ये मुंबईतील दादर क्लब येथे झालेल्या बीएसएएम महाराष्ट्र राज्य निवड स्पर्धेमध्ये आरव याने ज्युनिअर (२१ वर्षाखालील) स्नुकर स्पर्धेत दुसरे स्थान मिळवले होते. यासह सब-ज्युनिअर (१८ वर्षाखालील) स्नुकर आणि बिलीयर्डस् स्पर्धेतही दुसरे स्थान मिळवून आपली गुणवत्ता सिध्द केली होती. नोव्हेंबर २०२२ मध्ये इंदौर येथे झालेल्या राष्ट्रीय स्नुकर स्पर्धेत आरव याने सब-ज्युनिअर स्नुकर गटात चौथा क्रमांक मिळवला होता.

आरव संचेती हा राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय स्नुकर आणि बिलीयर्डस्पटू सचिन संचेती यांचा मुलगा असून आपल्या वडीलांप्रमाणेच त्याने या क्यु स्पोर्ट्स प्रकारात आपली गुणवत्त सिद्ध केली आहे. भारतीय (राष्ट्रीय) सब-ज्युनिअर स्नुकर गटात क्रमांक ४ तसेच महाराष्ट्र (राज्यस्तरीय) सब-ज्युनिअर आणि ज्युनिअर स्नुकर गटात क्रमांक २ असे आरवचे सध्याचे मानांकन आहे.

आरव हा यासिन मर्चंट यांच्या मार्गदर्शनाखाली यासिन मर्चंट स्नुकर अ‍ॅकॅडमी येथे प्रशिक्षण घेतो. तसेच पीवायसी हिंदू जिमखाना आणि अ‍ॅमेरोना फर्न क्लब येथे सराव करतो. हडपसर येथील ग्लोबल इंडिया इंटरनॅशनल स्कूलमध्ये आरव ७ वी इयत्तेमध्ये शिकत आहे.

या निवडीबद्दल बोलताना बिलीयर्डस् आणि स्नुकर फेडरेशन ऑल इंडियाचे अध्यक्ष राजन खिंवसरा म्हणाले की, आरव याला मी १० वर्षांचा असल्यापासून पहात आहे, ज्यावेळी स्नुकर खेळताना त्याला पायाखाली स्टूल घ्यायला लागायचे. लहान आणि तरूण खेळाडूंनी जागतिक स्पर्धेमध्ये भाग घेऊन देशाचे नाव उज्वल करावे, लहान वयाच्या गुणवान खेळाडूने जागतिक स्तरावर देशाचे प्रतिनिधीत्व करावे हे माझे स्वप्न होते. अशाप्रकारे राज्य आणि देशातील खेळाडूंसाठी ही तर केवळ सुरूवात आहे. आरव याला खेळाचे पॅशन तर आहेच शिवाय मनापासून तो नियमित सराव सुद्धा करतो, याचा अनुभव मी घेतला आहे. अशा गुणवान खेळाडूंनी जागतिक स्तरावरच्या उच्च स्पर्धांसाठी सहभागी व्हावे, यासाठी लागणार्‍या सर्वतो मदतीसाठी मी स्वतः आणि संपूर्ण बीएसएफआय कुटूंब नक्कीच पाठीशी उभे राहू, अशी ग्वाही मी देतो.

पीवायसी हिंदू जिमखाना चे प्रेसिडेंट कुमार ताम्हाणे म्हणाले की, पीवायसी हिंदू जिमखाना क्लब तर्फे क्यू स्पोर्ट्स ला नेहमीच प्रोत्साहन मिळाले आहे. क्लब चा खेळाडू आरव संचेती याने जागतिक स्तरावर आपल्या देशाचे तसेच शहराचे प्रतिनिधित्व करत आहे, ही आमच्या सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. क्लब मध्ये आरव सारखेच प्रतिभावान आणि गुणवान खेळाडू निर्माण होतील, अशा पद्धतीचे वातावरण व सोयी सुविधा देण्याचा आमचा प्रयत्न असेल.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading