एमएचटी-सीईटीच्या निकालात फिटजी पुणेच्या विद्यार्थ्यांची उत्कृष्ट कामगिरी
पुणे – अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र आणि कृषि अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी अनिवार्य असलेल्या राज्य सामाईक प्रवेश परीक्षेचा (एमएचटी-सीईटी) निकाल राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी सेल) आज सोमवारी सकाळी ऑनलाइन पद्धतीने जाहीर केला. फिटजी पुणेच्या सुमारे 35 विद्यार्थ्यांनी एमएचटी-सीईटीच्या निकालात ९८ टक्के पेक्षा जास्त गुण मिळवत उत्कृष्ट कामगिरी केली आहे. पार्थ उमेश कुलकर्णी, अनुप्रिया कर्ण आणि मैत्रन्या पाटील या विद्यार्थ्यांनी ९९.९ टक्के मार्क मिळविले आहेत. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित (पीसीएम) गटातून ३ लाख १३ हजार ७३०, तर भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र (पीसीबी) गटातून २ लाख ७७ हजार ४०० अशा एकूण ५ लाख ९१ हजार १३० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. ९२.९३ टक्के इतकी विद्यार्थ्यांच्या हजेरीची टक्केवारी आहे.
पार्थ कुलकर्णी म्हणाला की, या निकालाने मी खूप आनंदी झालो असून आता जेईई ऍडव्हान्स २०२३ मध्ये उच्च क्रमांक मिळविण्याचे माझे उद्दिष्ट आहे. गेल्या काही दिवसात मी फिटजी केंद्रातून असंख्य मॉक टेस्ट सोडवल्या आहेत, त्यामुळे माझा आत्मविश्वास वाढला आहे. माझे पालक आणि शिक्षक यांचे विशेष आभार मानतो.
अनुप्रिया कर्ण म्हणाली की, चाचण्यांचे प्रकार, वेळेवर शंकानिवारण, अत्यंत मार्गदर्शनपर प्रशिक्षण यामुळे मी हे यश साध्य केले आहे. माझ्या पालकांच्या सतत प्रोत्साहनामुळे आणि शिक्षकांच्या पाठिंब्यामुळेच हे शक्य झाले आहे.
फिटजी पुणे प्रमुख राजेश कर्ण यांनी यशस्वी विद्यार्थ्यांनेचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या.
राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे (सीईटी सेल) विविध पदवी-पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीच्या सीईटी घेतल्या जातात. राज्य सीईटी सेलमार्फत ही परीक्षा ३६ जिल्ह्यांच्या ठिकाणी १९७ परीक्षा केंद्रांवर घेण्यात आली. यापैकी १८१ केंद्रे ही महाराष्ट्रात आणि १६ केंद्रे ही महाराष्ट्राच्या बाहेर होती.
