Tuesday, June 16, 2026
Latest NewsPUNE

सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठ, पुणे’च्या नियामक मंडळाच्या अध्यक्षपदी डॉ. प्रमोद चौधरी यांची नियुक्ती

पुणे  : सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठ, पुणे या संस्थेच्या नियामक मंडळाच्या अध्यक्षपदी भारताचे ‘इथॅनॉल  मॅन’ अशी ओळख असलेले जेष्ठ उद्योजक डॉ. प्रमोद चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागातर्फे सदर नियुक्ती एक परिपत्रकाच्या माध्यमातून जाहीर करण्यात आली. ही नियुक्ती ही ५ वर्षांसाठी आहे. यापूर्वी डॉ. चौधरी यांनी नियामक मंडळाचे सदस्य म्हणून काम पहिले आहे. आयआयटी, मुंबई व हार्वर्ड बिझनेस स्कूलचे माजी विद्यार्थी असलेले डॉ.चौधरी हे बायोफ्युएल व बायोकेमिकल या क्षेत्रांसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान व अभियांत्रिकी सेवा पुरवणाऱ्या जागतिक कीर्तीच्या प्राज इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीचे संस्थापक व कार्यकारी अध्यक्ष आहेत. सीओईपी अर्थात कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पुणे या संस्थेला स्वायत्तता मिळून त्याचे तंत्रज्ञान विद्यापीठ रुपांतर झाल्यावर गठीत झालेल्या पहिल्या पूर्णवेळ नियामक मंडळाचे अध्यक्षपद भूषविण्याचा मान डॉ. चौधरी यांना मिळाला आहे.

डॉ. चौधरी यांनी विविध सामाजिक, शैक्षणिक व औद्योगिक संस्थांची महत्वाची पदे भूषवली आहेत. ज्यामध्ये प्रामुख्याने मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड अॅग्रीकल्चरचे अध्यक्ष, पुणे इंटर नॅशनल सेंटरचे संस्थापक सदस्य, पुण्यातील सायन्स अँड टेक्नोलॉजी पार्कचे अध्यक्ष, वर्ल्ड बायो इकॉनॉमी फोरमच्या सल्लागार समितीचे सदस्य, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सल्लागार समितीचे अध्यक्ष आदींचा समावेश आहे.

जैवइंधन क्षेत्रात डॉ चौधरी यांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीची दखल राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर घेण्यात आली असून त्यांना विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. यामध्ये प्रामुख्याने जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर पुरस्कार (हा पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय), इंजिनिअरींग कौन्सिल ऑफ इंडियातर्फे देण्यात येणारा मानाचा एमिनंट इंजिनिअर पुरस्कार, जागतिक मराठी अकादमीचा जागतिक मराठी भूषण पुरस्कार, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा जीवन साधना गौरव पुरस्कार या सारख्या अनेक पुरस्कारांचा समावेश आहे.

या नियुक्तीवर प्रतिक्रिया देताना डॉ. प्रमोद चौधरी म्हणाले, “राज्य सरकारने सीओईपी सारख्या प्रतिष्ठित संस्थेची एक मोठी जवाबदारी माझ्यावर सोपवली याचा आनंद होत आहे. संस्थेच्या लौकिकात भर टाकणारी कामगिरी करून संस्थेचे मानांकन उंचावण्यासाठी मी व माझे सहकारी पूर्ण प्रयत्न करू. तसेच उद्योगांच्या आजघडीच्या व भविष्यातील गरजा लक्षात घेत त्यासाठी आवश्यक ज्ञान आणि कौशल्ये असणारे अभियंते निर्माण करून अभियांत्रिकी क्षेत्रात भारताला जागतिक पातळीवर आघाडीचं स्थान प्राप्त करायचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून काम करू. त्यासाठी नियोजनबद्ध पद्धतीने पाऊले उचलून कालबद्ध आरखडा तयार करण्याचे काम प्राधान्याने हाती घेऊ.”

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading