चरित्रात्मक संशोधनासाठी युवकांनी पुढे यावे : रामचंद्र गुहा
पुणे : चरित्रात्मक संशोधनासाठी युवकांनी पुढे येणे आणि लेखन करणे गरजेचे आहे असे प्रतिपादन प्रख्यात इंग्रजी लेखक आणि विचारवंत पद्मभूषण डॉ. रामचंद्र गुहा यांनी केले.
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या ११८ व्या वर्धापन दिन समारंभानिमित्त आयोजित ग्रंथ पुरस्कार प्रदान समारंभात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे होते. व्यासपीठावर मसापच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष प्रा. डॉ. शिवाजीराव कदम, कार्यकारी विश्वस्त डॉ. पी. डी. पाटील, कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, कोषाध्यक्ष सुनिताराजे पवार उपस्थित होते.
गुहा म्हणाले, इतिहासाचे लेखन हे कायमच साहित्याच्या जवळ असते. अनेकदा चरित्रकार इतिहासाचा हात धरून लेखन करत असतो. महाराष्ट्रातील सुधारकांचा नव्याने अभ्यास करून त्यांचे संशोधनात्मक लेखन होणे गरजेचे आहे. काळाच्या पडद्याआड गेलेले आचार्य अत्रे, दुर्गाबाई भागवत यांच्यावर नव्याने संशोधनात्मक लेखन होणे गरजेचे आहे.
चरित्रात्मक लेखन करताना ते सत्याच्या आधारावर उभे असायला हवे. तिथे साहित्यातील कल्पनाविलास असू नये. आत्मचरित्रातून जे उलगडले नाही ते उलगडण्याचा चरित्रकाराने प्रयत्न करायला हवा. चरित्र लिहिताना केवळ ती व्यक्तीकेंद्रित न लिहिता तिच्याशी जोडलेल्या व्यक्ती, सामाजिक संदर्भ सुद्धा यावेत, असा मौलिक सल्ला डॉ. गुहा यांनी दिला.
अध्यक्षस्थानावरून बोलताना डॉ. रावसाहेब कसबे म्हणाले, जग एका अरिष्टातून जाते आहे. भांडवलशाहीच्या अंताची चाहूल लागलेली असल्याने नव्याचा शोध हा महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांपाशीच येऊन थांबेल याची जाणीव आता जगाला झालेली आहे. आजच्या घडीला राजकीय स्वार्थासाठी इतिहासाचे विकृत आकलन सुरू झाले आहे. ते आपल्याला आज्ञापालक बनवू पाहत आहेत..
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वाटचालीचा आढावा प्रा. मिलिंद जोशी यांनी प्रास्ताविकातून घेतला. ते म्हणाले, लेखकामधील पार्टी पॉलिटिक्स हे साहित्यासमोरील सर्वात मोठे आव्हान आहे. विचारधारांचे झेंडे घेण्यापेक्षा सत्याचे झेंडे लेखकांनी खांद्यावर घ्यायला हवेत. पूर्वीचे चांगले आणि आधुनिकता यांचा सुंदर मिलाफ साधत मसापची वाटचाल सुरु आहे.
यानिमित्ताने उपस्थित खासदार श्रीनिवास पाटील, डॉ. राजा दीक्षित, डॉ. माधव गाडगीळ यांचाही सन्मान करण्यात आला. मसापच्या देणगीदारांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन उद्धव कानडे यांनी केले. सुनीताराजे पवार यांनी आभार मानले.
पुरस्कार प्राप्त मान्यवर पुढील प्रमाणे :
विशेष ग्रंथकार पुरस्काराचे मानकरी : विजय बाविस्कर, वामनराव देशपांडे, डॉ. चैतन्य कुंटे, डॉ. राजेंद्र दास, नीलम माणगावे, सविता घाटे, प्रा. हरी नरके, प्रवीण काळोखे व रश्मी काळोखे, अरुणा सबाने, सम्राट फडणीस, प्रभाकर साळेगावकर आणि स्वाती राजे, ऍड. जयदेव गायकवाड, अरुण नूलकर, श्रीकांत बोजेवार, अरुण हरकारे, सुनील माळी, डॉ. नलिनी गुजराथी, डॉ. विलास चिंतामण देशपांडे.
वार्षिक ग्रंथ पारितोषिकांचे मानकरी : एअर मार्शल भूषण गोखले, मुकुंद संगोराम, माधव वझे, डॉ. बी.जी. शेखर, प्रफुल्ल वानखेडे, राजू बाविस्कर, डॉ. शिरीष भावे, यशोदा वाकणकर, डॉ. मानसी फडके, प्रतिभा जगदाळे, सचिन पाटील, प्रा. हनुमंत पवार, डॉ. श्रीकांत पाटील, डॉ. मंदा खांडगे, डॉ. स्वाती कर्वे, डॉ. कल्याणी दिवेकर, डॉ. विद्या देवधर, रामराव झुंजारे, डॉ. कीर्ती मुळीक, डॉ. पंडित टापरे, प्रदीप मांडके, डॉ. वर्षा तोडमल, डॉ. मधुकर क्षीरसागर, डॉ. शिवाजीराव देशमुख, डॉ. कैलास इंगळे, विलास वरे, उदय जोशी, मकरंद भारंबे, डॉ. विद्या देशपांडे, सुहासिनी चित्रे, वीरभद्र मिरेवाड, डॉ. सुमित साळुंखे, विलास मोरे, स्वप्नील पोरे, डॉ. गुरुदास नूलकर, आरती देवगावकर, अशोक इंदलकर, श्रिया टेम्से, डॉ. आनंद मोरे, डॉ. स्मिता दातार, प्रशांत पवार, रमेश देसाई.