पर्यावरण जनजागृतीपर फोटोथॉन २०२३ छायाचित्रण स्पर्धा
पुणे : इकोफोक्स आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळतर्फे पर्यावरणप्रेमींसाठी आणि छायाचित्रकारांसाठी अनोखी पर्वणी उपलब्ध होत आहे. पर्यावरणाचे जतन करीत त्याचे महत्त्व छायाचित्रांच्या माध्यमातून पटवून देण्यासाठी फोटोथॉन २०२३ ही छायाचित्रण स्पर्धा पुण्यात होणार आहे. नेमून दिलेल्या अवघ्या २४ तासाच्या वेळेत लाईव्ह छायाचित्र काढून स्पर्धकांना स्पर्धेत सहभाग घ्यायचा आहे. शनिवार, दिनांक ३ जून रोजी सकाळी १०.३० वाजता नवी पेठेतील म्हात्रे पूलाजवळील इंद्रधनुष्य सभागृह येथे स्पर्धेचे उद््घाटन होणार आहे, अशी माहिती स्पर्धेचे आयोजक परेश पिंपळे यांनी दिली.
स्पर्धेच्या दिवशी छायाचित्रकारांनी नवी पेठेतील म्हात्रे पूलाजवळील इंद्रधनुष्य सभागृहात एकत्रित यायचे आहे. उद््घाटनानंतर २४ तासांमध्ये छायाचित्रकारांनी त्यांचे कौशल्य वापरुन पर्यावरणाशी संबधित विविध छायाचित्रे टिपायची आहेत. आजच्या युगात जवळपास प्रत्येकाकडे मोबाईल फोनमध्ये कॅमेरा आहे. या गोष्टीचा फायदा जर प्रत्येकाने पर्यावरणाचे जतन आणि संवर्धन करण्याचा विचार मांडण्यासाठी केला, तर या चळवळीला व्यापक जनसहभाग मिळेल. फोटो विथ मोटो हा विचार पर्यावरण चळवळीत मोठा बदल घडवेल आणि हेच फोटोथॉनचे वैशिष्टय आहे.
फोटो स्टोरी, नेचर, मोबाईल छायाचित्र आदी श्रेणीत पारितोषिके दिली जाणार आहेत. स्पर्धेतील प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकांना रोख रक्कम व स्मृतिचिन्ह, प्रशस्तीपत्रक देण्यात येईल. यंदा पुण्यासह मुंबई, नाशिक, नागपूर, छत्रपती संभाजी नगर या शहरांत देखील स्पर्धा होणार आहे. सर्व ठिकाणी मिळून एकूण सुमारे ३ लाख रुपयांची पारितोषिके देण्यात येणार आहेत. यापूर्वी विविध सामाजिक समस्यांवर प्रकाश टाकण्यासाठी फोटोथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
एक छायाचित्र हे १ हजार शब्दांचा अर्थ सांगते, त्यामुळे या विचाराने स्पर्धेची सुरुवात झाली. एखादे छायाचित्र सर्व बंधनांच्या पलिकडे जाऊन संवाद साधण्याचे परिणाम साधू शकते. त्यामुळे पर्यावरणाशी निगडीत विविध स्तरांवर चित्रांच्या माध्यमातून प्रकाश टाकण्याचा प्रयत्न यामाध्यमातून छायाचित्रकार करणार आहेत. व्यावसायिक, शिकाऊ, नवोदित अशा १८ वर्षावरील सर्व छायाचित्रकारांसाठी स्पर्धा खुली आहे. स्पर्धेत सहभागी होण्याकरिता मो. ९९२२४४८९०४ किंवा www.ecofolks.com या संकेतस्थळावर संपर्क साधण्याचे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे.