‘दीपक’ मैफलीत रसिकांनी अनुभवला नृत्य, गायन, वादनाचा त्रिवेणी संगम
पुणे : ‘गणेशस्तुती’मधून साकारलेली अनोखी नृत्यवंदना, युवा आश्वासक गायक विराज जोशीने मोजक्या वेळात मांडलेला ‘शुद्ध सारंग’ आणि दमदार पखवाजवादन, असा त्रिवेणी संगम रसिकांनी रविवारी सकाळी येथे अनुभवला.
कथक नृत्यांगना शीतल कोलवालकर आणि कथकनाद संस्थेच्या वतीने ‘दीपक – अ सोर्स ऑफ लाईट’ या मैफलीचे आयोजन करण्यात आले होते. मयूर कॉलनी येथील एमईएस बालशिक्षण सभागृहात सदर कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी प्रसिद्ध तबलावादक पद्मश्री पंडित विजय घाटे, ज्येष्ठ व्हायोलिनवादक पं. अतुलकुमार उपाध्ये, आर्य संगीत प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष वर सुप्रसिद्ध गायक श्रीनिवास जोशी आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
“‘नवोदित कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने वडिलांच्या स्मृतीनिमित्त ही मैफल आयोजित केली आहे. कथक गुरू विदुषी शमा भाटे यांना संगीत नाटक अकादमीचा सन्मान मिळाल्याने त्यांचा कृतज्ञता सत्कार करण्याची संधी या उपक्रमात मिळते आहे, याचा विशेष आनंद आहे,’ असे नमूद करून शीतल कोलवालकर यांनी शमाताई भाटे यांचा सत्कार केला.
मैफलीची सुरुवात शीतल यांच्या विद्यार्थिनींनी सादर केलेल्या ‘गणेशवंदने’ने झाली. ‘ईश गजानन करिती नर्तन’ ही त्यांनी सादर केलेली गणेशस्तुती उत्तम सादरीकरणामुळे वेधक ठरली. तसेच ‘कयु तुम रूठ गये मनमोहन… ‘ या रचनेतूनही शीतल यांच्या शिष्यद्वयीने अभिनय आणि पदन्यासाचे आश्वासक दर्शन घडवले.
त्यानंतर पं. भीमसेन जोशी यांचे नातू युवा गायक विराज जोशी यांचे गायन झाले. विराजने राग शुद्ध सारंग मध्ये ‘ सुंदर कांचन’ ही बंदिश पेश केली. विराज हे आपले वडील व गुरु श्रीनिवास जोशी यांकडून संगीताचे शिक्षण घेत आहेत. ‘ माझे आजोबा भीमसेन जोशी राग शुद्ध सारंग क्वचितच गायले. खूप वर्षांपूर्वी त्यांनी औंध येथील संगीत महोत्सवात पं. शिवरामबुवा वझे यांनी गायिलेला अप्रतिम शुद्ध सारंग ऐकून आपण हा राग गायचा नाही, असे मनात ठरवले होते आणि ते पाळले. शेवटी टाईम्स म्युझिकच्या ‘अनसंग’ या शीर्षकाखाली त्यांनी या रागाचे ध्वनिमुद्रण केले, अशी आठवण विराजने सांगितली. अतिशय मोजक्या वेळात विराजने शुद्ध सारंगची मांडणी केली. अपूर्व पेठकर (संवादिनी), पांडुरंग पवार (तबला) आणि बाळासाहेब गरूड (टाळ) यांनी साथसंगत केली.
तरूण पिढीचे प्रतिनिधित्व करणाऱ्या शुभम उगले यांचे पखवाज वादन रसिकांची जोरदार दाद मिळवणारे ठरले. शुभम हे कै. पं गोविंद भिलारे आणि पं योगेश समसी यांचे शिष्य आहेत. शुभम यांनी सुरवातीला चौताल सादर केला. नाना पानसे घराण्यातील पं. वसंतराव घोरपडकर यांच्या काही रचना, गुरूस्तुती परण, शिवपरण, दुर्गापरण तसेच गुरू पं. योगेश समसी यांच्याकडून मिळालेल्या पंजाब घराण्याच्या वैशिष्ट्यपूर्ण रचना शुभम यांनी सादर केल्या. त्यांना अपूर्व पेठकर यांनी संवादिनीची साथ केली. शुभम यांच्या दमदार पखवाज वादनानंतर प्रसिद्ध गायक सुरंजन खंडाळकर यांचा विशेष गायन सहभाग असलेल्या ‘अवघे गर्जे पंढरपूर चालला नामाचा गजर’ या भक्तिरचनेने आणि शीतल यांच्या काव्यरचनेने या रंगतदार मैफलीची सांगता झाली. आनंद देशमुख यांनी सूत्रसंचालन केले.