fbpx
Saturday, December 2, 2023
Latest NewsSports

Vision Cup : व्हिजन लायन्स् संघाला विजेतेपद !!

पुणे :  व्हिजन स्पोर्ट्स सेंटर तर्फे आयोजित ‘व्हिजन करंडक’ अजिंक्यपद १५ वर्षाखालील टेव्न्टी-२० क्रिकेट स्पर्धेत उजव्या हाताचा ऑफ ब्रेक फिरकी गोलंदाज धवल देशपांडे याच्या अचूक गोलंदाजीच्या कामगिरीमुळे व्हिजन लायन्स् संघाने लेपर्डस् इलेव्हन संघाचा ९ धावांनी पराभव करून स्पर्धेचे विजेतेपद संपादन केले.

सनसिटी रोड येथील व्हिजन क्रिकेट अ‍ॅकॅडमी मैदानावर झालेला अंतिम सामना कमी धावसंख्येचा आणि अधिक मानसिक दबावाचा ठरला. नाणेफेक जिंकून लेपर्डस् इलेव्हन संघाने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. व्हिजन लायन्स् संघाने श्रेयस व्हावळे (३६ धावा), रणवीर मते (१७ धावा) आणि सायन पात्रा (१४ धावा) यांच्या फलंदाजीच्या जोरावर २० षटकामध्ये १०८ धावा धावफलकावर लावल्या. लेपर्डस् संघाच्या साहील कुलकर्णी याने भेदक गोलंदाजी करत ६ धावात ४ गडी टिपले आणि लायन्स् संघाच्या फलंदाजीला वेसण घातले.

फलंदाजीस उतरलेल्या लेपर्डस् इलेव्हन संघाने सावध सुरूवात केली. अदवय सोनावणे याने ४० धावा तर, वेदांत गावडे याने १२ धावा करून लेपर्डस् संघाला विजयाचा रस्ता दाखवला होता. पण लायन्स्चा फिरकीपटू धवल देशपांडे याने २३ धावात ३ गडी बाद करून लेपर्डस्च्या फलंदाजीला खिंडार पाडले. जयेश ओझा यानेही १५ धावात २ गडी बाद करत अचूक गोलंदाजी केली. ठराविक अंतराने फलंदाज बाद होत गेले व लेपर्डस् संघाचा डाव १८.२ षटकामध्ये ९९ धावांवर आटोपला आणि व्हिजन लायन्स् संघाने विजयश्री खेचून आणली.

स्पर्धेचे पारितोषिक वितरण स्पर्धेचे संचालक आणि संयोजक गणेश जोशी यांच्या हस्ते करण्यात आले. विजेत्या व्हिजन लायन्स् आणि उपविजेत्या लेपर्डस् इलेव्हन संघांना करंडक आणि मेडल्स् देण्यात आली. स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू आणि सर्वोत्तम फलंदाजाचा मान व्हिजन लायन्स्च्या रणवीर मते (२०८ धावा) याला मिळाला. सर्वोत्कृष्ट गोलंदाज अमोघ नातू (१३ विकेट, लायन्स्), सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक अक्षय शेडगे (जॅग्वॉर्स इलेव्हन) याला देण्यात आला.

सामन्याचा संक्षिप्त निकालः अंतिम सामनाः
व्हिजन लायन्स्ः २० षटकात ९ गडी बाद १०८ धावा (श्रेयस व्हावळे ३६, रणवीर मते १७, सायन पात्रा १४, साहील कुलकर्णी ४-६) वि.वि. लेपर्डस् इलेव्हनः १८.२ षटकात १० गडी बाद ९९ धावा (अदवय सोनावणे ४०, वेदांत गावडे १२, धवल देशपांडे ३-२३, जयेश ओझा २-१५); सामनावीरः धवल देशपांडे;

Leave a Reply

%d bloggers like this: