अभिनेता आदित्य सिंह राजपूतचा गुढरीत्या मृत्यू
मुंबई : मॉडेल-अभिनेता आणि कास्टिंग डायरेक्टर आदित्य सिंग राजपूत याचा आज (22 मे) अंधेरी येथील घरात बाथरूममध्ये मृतदेह आढळून आला. आदित्यच्या मित्राला तो त्याच्या घराच्या बाथरूममध्ये बेशुद्धावस्थेत आढळला होता. त्यानंतर त्याने वॉचमॅनच्या मदतीने आदित्यला रुग्णालयात नेले. रुग्णालयात आदित्यला मृत घोषित करण्यात आले. आदित्यच्या मृत्यूमागील कारण अजून स्पष्ट झालेलं नाही. मात्र, ड्रग ओव्हरडोसमुळे हा मृत्यू झाला असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे. आदित्यच्या मृत्यूनं मनोरंजन विश्वाला धक्का बसला आहे.
आदित्य सिंह राजपूतने वयाच्या 17 व्या वर्षी मनोरंजन क्षेत्रातील करिअरला सुरुवात केली होती. आदित्यचा जन्म दिल्लीत झाला. त्यांचे कुटुंब उत्तराखंड येथील आहे. आई,वडील, एक मोठी बहीण असं आदित्यचं कुटुंब आहे. आदित्य ‘क्रांतिवीर’ आणि ‘मैंने गांधी को नहीं मारा’ या चित्रपटात दिसला होता. त्याने अनेक जाहिरातींमध्येही काम केले होते. काही रिअॅलिटी टीव्ही शोचा तो भाग होता. ‘स्प्लिटव्हील’ या शोमध्ये आदित्य सिंह राजपूतने काम केले होते.
