अध्यक्षांनी निर्णय घेताना तात्कालिन परिस्थिती विचारात घेणे बंधनकारक
मुंबई : ‘त्या’ 16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय घेताना विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर (Adv. Rahul Narvekar) यांना न्यायालयाने चौकट आखून दिली आहे. त्यामुळे अध्यक्षांनी निर्णय घेताना तात्कालिन परिस्थिती विचारात घेणे बंधनकारक आहे, असा दावा शिवसेना (ठाकरे गट) नेते अनिल परब (Adv. Anil Parab) यांनी केला आहे.
गेल्या 11 महिन्यांपासून सुरू असलेल्या महाराष्ट्रातील राजकीय नाट्यावर काल सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला. या निकालाचे सविस्तर विवेचन अनिल परब यांनी प्रसारमाध्यमांसमोर केले. यावेळी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) उपस्थित होते.
परब म्हणाले, निकाला नंतर सत्ताधारी पक्षातील लोकांनी आनंदोत्सव साजरा केला. मात्र न्यायालयांच्या निकालाचे वाचन न करता हे सेलिब्रेशन सुरू आहे. वास्तविक न्यायालयाने ‘त्या’ 16 आमदाच्या अपात्रतेचा निर्णय घेताना कोणत्या बाबी लक्षात घेतल्या पाहिजेत या विषयी चौकट घालून दिली आहे. त्यामुळे अध्यक्षांना निर्णय घेताना तात्कालिन परिस्थिती व कायदेशीर बाबी या विचारात घ्याव्या लागणार आहे. त्यानुसार 20 जून पूर्वीचा शिवसेना पक्ष आणि प्रतोदचा व्हीप कायदेशीर मानत निर्णय घेणे बांधकारक आहे. तसेच हा निकाल ठरावीक कालावधीत म्हणजे किमान 15 दिवसांच्या आत घेणे अपेक्षित आहे.
