Thursday, September 3, 2026
Latest NewsPUNE

डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे बहुआयामी प्रतिभावंत – डॉ. नरेंद्र जाधव

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

पुणे – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे केवळ घटनेचे शिल्पकार नाही तर ते उत्कृष्ट विद्यार्थी, अर्थतज्ज्ञ, अर्थ प्रशासक, कायदेतज्ज्ञ, समाजशास्त्रज्ञ, शिक्षणतज्ज्ञ, मानववंशशास्त्रज्ञ, राजकीय मुसद्दी, भाषावाद प्रांतरचनेचे शिल्पकार, बौद्ध धर्म चक्र प्रवर्तक असे बहुआयामी प्रतिभावंत होते असे मत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे विश्लेषक, ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ, भारताच्या नियोजन आयोगाचे माजी सदस्य आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ.नरेंद्र जाधव यांनी व्यक्त केले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विद्यापीठातील त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत अभिवादन करण्यात आले. यावेळी आयोजित ‘ महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर बहुआयामी प्रतिभावंत’ या व्याख्यानादरम्यान ते बोलत होते. यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र कुलगुरू डॉ.संजीव सोनवणे, कुलसचिव डॉ.प्रफुल्ल पवार, डॉ.बाबासाहेब आंबेडकर अध्यासनाचे प्रमुख डॉ.मनोहर जाधव, अण्णाभाऊ साठे अध्यासन प्रमुख डॉ.सुनील भंडगे, व्यवस्थापन परिषद सदस्य रविंद्र शिंगणापूरकर, डॉ.नितीन घोरपडे, अधिष्ठाता डॉ.पराग काळकर, डॉ.विजय खरे, वसुंधरा जाधव, अधिसभा सदस्य आदी यावेळी उपस्थित होते.

यावेळी डॉ.नरेंद्र जाधव म्हणाले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे केवळ पुस्तकी अर्थतज्ज्ञ नव्हते ते कार्य कुशल प्रशासक देखील होते. भारतातील सर्वश्रेष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ.आंबेडकर होते. देशात एम्प्लॉयमेंट एक्सचेंजची स्थापना, कामगारांच्या कामाचे तास १२ वरून ८ तास करणे आणि महिला कर्मचाऱ्यांना प्रसुतीपूर्व रजा हे सर्व त्यांच्या प्रयत्नातून झालेले बदल आहेत. महात्मा गांधी आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संबंधाबाबत बोलताना ते म्हणाले, काही विषयात या दोघांमध्ये वैचारिक मतभेद असले तरी देशाच्या हिताबाबत त्यांनी कायम एकत्र काम केले.

यावेळी डॉ.संजीव सोनवणे म्हणाले, डॉ.जाधव यांच्या एकाच व्याख्यानातून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे संपूर्ण व्यक्तिमत्त्व विविध घटनांचे दाखले देत आपल्यासमोर उभे राहिले. आपले हे भाषण आम्हा सर्वांचा पुढील अनेक दिवस प्रेरणा देत राहिल. आपण विद्यापीठाच्या सल्लागार परिषदेचे सदस्य म्हणून विद्यापीठाला मार्गदर्शन करत राहावे असे आवाहन डॉ.सोनवणे यांनी डॉ.जाधव यांना यावेळी केले.

यावेळी डॉ.प्रफुल्ल पवार म्हणाले, दिनांक ११ एप्रिल ते १४ एप्रिल या काळात विद्यापीठाच्या महात्मा फुले अध्यासन, अण्णाभाऊ साठे अध्यासन, डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन यांच्या माध्यमातून शिव, फुले, शाहू, आंबेडकर संयुक्त जयंती समितीच्या माध्यमातून स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या तत्त्वावर अनेक व्याख्यानाचे आयोजन केले आहे. विद्यापीठाचे व्यासपीठ हे सर्व विचारांचे खुले व्यासपीठ आहे असे सांगत त्यांनी उपस्थितांचे आभार मानले. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.कारभारी काळे यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading