क्रीडा मानसशास्त्रामुळे मिळते आव्हानांचा सामना करण्याची ताकद – डॉ. हेमंत गायधनी
पुणे – आजच्या धकाधकीच्या म्हणजेच वेगवान झालेल्या आयुष्यात प्रत्येक गोष्टीचे योग्य पद्धतीने नियोजन होणे आवश्यक आहे. क्रीडाक्षेत्र याला अपवाद नाही. क्रीडाक्षेत्रा समोरची आव्हानेही आता अधिक कठिण झाली आहेत. त्यामुळे त्यांचेही नियोजन होणे आवश्यक आहे आणि यासाठीच क्रीडा मानसशास्त्र उपयोगी पडते, असे मत डॉ. हेमंत गायधनी यांनी मांडले.
लीड्स बेकेट विद्यापीठातील कार्नेगी स्कुल ऑफ स्पोर्टस च्या विद्यार्थ्यांनी पुण्याला भेट दिली. यावेळी आयएसएमएसच्या संचालिका शालिनी बॅनर्जी आणि लीड्स बेकेट विद्यापीठातील कार्नेगी स्कुल ऑफ स्पोर्टसचे 20 विद्यार्थी उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
आपल्या मुलाने क्रीडाक्षेत्रात कारकिर्द करण्याचा निर्णय घेतला की खेळ निवडण्यापासून, खेळाचा सराव आणि प्राशिक्षण अशा सर्वच आघाड्यांपासून अभ्यास होणे आवश्यक असते. थोडक्यात आपण खेळ कसा निवडायचा आणि त्यात कसे रहायचे हे सगळे आपल्याला क्रीडा मानसशास्त्र शिकवते. आपल्या खेळाचे नियोजन करण्यासाठी याचा सर्वात मोठा उपयोग होत असल्यामुळे अलिकडे खेळाबरोबर क्रीडा मानसशास्त्राचे महत्व वाढले आहे. सुरुवातीपासून क्रीडा मानसशास्त्राचा अभ्यास केला आपल्यालाच खेळाचे नियोजन करणे शक्य होते. भविष्या्च्या दृष्टिने हे महत्वाचे आहे, असेही गायधनी म्हणाले.
भारतीय खेळाडू ऑलिम्पिकपर्यंत पोचतात. पदकांच्या संख्येतही आता वाढ व्हायला लागली आहे. पण, काही वैयक्तिक खेळ असे आहेत की आपण ऑलिम्पिक पर्यंत पोचतो. पण, पदकापर्यंत पोचू शकत नाही. आपल्याकडे जिंकण्याची मानसिकता कमी आहे. सहभागी होतो. पदकापर्यंत पोचण्याचा आपण विचारच करत नाही. हा विचार करण्यास आपल्याला क्रीडा मानसशास्त्र शिकवते. अपयश ही यशाची पहिली पायरी असते हे आता नवे नाही. पण, अलिकडे मुले अपयशाचा सामना करू शकत नाहीत. ते लवकर निराश होतात. पण, क्रीडा मानसशास्त्राचा अभ्यास केल्यास त्यांना या निराशेतून बाहेर पडण्यास मदत होते. एक प्रकारची सांघिक भावना खेळाडूंमध्ये निर्माण होते, असेही गायधनी म्हणाले.
लीड्स बेकेट विद्यापीठातील कार्नेगी स्कुल ऑफ स्पोर्टस च्या विद्यार्थ्यांनी शिवाजीनगर येथील पुणे जिल्हा मेट्रोपॉलिटन बॅडमिंटन संघटनेला भेट दिली. यावेळी पुणे जिल्हा मेट्रोपॉलिटन बॅडमिंटन संघटनेचे सचिव रणजीत नातू यांनी या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
