Tuesday, June 16, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

महाराष्ट्र अधिवक्ता संरक्षण कायदा आणण्याच्या दृष्टीने कार्यवाही – विधानसभा अध्यक्ष ॲङ राहुल नार्वेकर.

मुंबई – महाराष्ट्रात वकीलांना मारहाण होण्याच्या घटना वाढत असून त्यांना संरक्षण देण्यासंदर्भात “महाराष्ट्र अधिवक्ता संरक्षण कायदा” आणण्याच्या दृष्टीने सरकारने कार्यवाही करावी. त्याचप्रमाणे महाराष्ट्र अधिवक्ता कल्याण निधी अधिनियम, १९८१ हा कायदा बदलून सुधारीत प्रभावी कायदा आणण्याच्या दृष्टीने देखिल प्रयत्न व्हावेत असे मत विधानसभा अध्यक्ष, ॲङ  राहुल नार्वेकर यांनी व्यक्त केले.

आज दिनांक ६ एप्रिल, २०२३ रोजी विधानसभा अध्यक्ष यांचे दालनात बार कॉन्सिल ऑफ महाराष्ट्र ॲण्ड गोवा संस्थेचे पदाधिकारी आणि ज्येष्ठ वकीलांच्या शिष्टमंडळाने त्यांची भेट घेतली आणि यासंदर्भातील मागणीचे निवेदन त्यांना सादर केले. यावेळी झालेल्या चर्चेप्रसंगी वकीलांनी आपल्या मागण्या विधानसभा अध्यक्षांना सादर केल्या. यासंदर्भात आपण स्वत: पुढाकार घेऊन मा. राज्यपाल, मा. मुख्यमंत्री आणि मा.उप मुख्यमंत्री यांना पत्राद्वारे सुचित करु, असे आश्वासन या प्रसंगी विधानसभा अध्यक्ष, ॲङ राहुल नार्वेकर यांनी दिले.

वकील हे जनता व न्यायालय यातील महत्वाचा दुवा असतात. जनसामान्यांना न्याय मिळावा यादृष्टीने वकील वर्ग सातत्याने कार्यरत असतो. त्यांच्यावर होणाऱ्या हल्याच्या घटना या अप्रत्यक्षपणे जनतेच्या न्याय्य हक्‍कांवर होणारा हल्ला आहे. अशा घटनांना पायबंद बसून निकोप वातावरण कायम राहण्याच्या दृष्टीने नवीन कायदा अतिशय उपयुक्त ठरेल, असेही यावेळी विधानसभा अध्यक्ष, ॲङ  राहुल नार्वेकर यांनी सांगितले. या शिष्टमंडळात ॲड. जयंत जायभावे, ॲड. मिलिंद पाटील, ॲड. संग्राम देसाई, ॲड. विठ्ठल कोंडे-देशमुख, ॲड. मिलिंद थोबडे, ॲड. सतीश देशमुख, ॲड. विवेक घाडगे, ॲड. अहमद खान पठाण, ॲड. गजानन चव्हाण, ॲड. संदिप केकाणे यांचा समावेश होता.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading