Tuesday, June 16, 2026
Latest NewsPUNE

श्री काळ भैरवनाथ उत्सवानिमित्त कसब्यात ‘बगाड’

पुणे : श्री काळ भैरवनाथ महाराज की जय.. चा अखंड जयघोष… पालखी खांद्यावर घेताच फुले आणि गुलालाची झालेली मुक्त उधळण आणि पारंपरिक वाद्य  ढोल-ताशा व बँड च्या निनादात कसबा पेठेतील पुण्याचे प्राचीन ग्रामदैवत व क्षेत्रपाल श्री काळ भैरवनाथ महाराजांची पालखी व बगाड मोठया उत्साहात साजरे झाले. शेकडो वर्षांची परंपरा जपत साजरा झालेला ‘बगाड’ उत्सव पाहण्याकरिता पुणेकरांनी मोठी गर्दी केली होती.
श्री बहिरोबा देव ट्रस्ट, श्री काळ भैरवनाथ मंदिर तर्फे कसबा पेठेतील पुण्याचे प्राचीन ग्रामदैवत व क्षेत्रपाल श्री काळ भैरवनाथ महाराजांच्या उत्सवांतर्गत लघुरुद्र, अष्टोत्तरी नामावली, आरती, पालखी व नवीन बगाड उद््घाटन, महापूजा असे विविध कार्यक्रम पार पडले. पालखी व नवीन बगाड उद््घाटन श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टचे कार्यकारी विश्वस्त अ‍ॅड.शिवराज कदम जहागिरदार यांच्या हस्ते झाले.
रात्री ९ वाजता मुख्य बगाड सोहळा मोठया उत्साहात पारंपरिक पद्धतीने पार पडला. त्यानंतर रात्री ९.३० वाजता महापूजा व आरतीचे आयोजन करण्यात आले होते. मंदिराला फुलांची आकर्षक आरास व विद्युत रोषणाई करण्यात आली. श्री काळभैरवनाथ हे पुण्याचे जागृत ग्रामदैवत असून भैरवनाथ मंदिराचे गर्भगृह आणि मध्यगृह हेमाडपंथी बांधणीचे आहे.
मंदिराचे व्यवस्थापन आजपर्यंत लडकत घराण्याकडे असून वर्षभरात विविध उत्सव केले जातात. त्यातीलच एक मुख्य उत्सव असलेला हा उत्सव अनेक वर्षे साजरा केला जातो. कसबे पुणे ही बाराशे वर्षांपूर्वीची पुण्यातील वस्ती. याठिकाणी मुल:, मुक्ता आणि नाग या तीन नद्यांचा पवित्र त्रिवेणी संगम आहे. गाव तेथे मारुती आणि भैरवनाथाचे मंदिर ही आपल्याकडील परंपरा आहे. त्यामुळे या मंदिराला व येथील उत्सवाला विशेष महत्व आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading