Tuesday, June 16, 2026
Latest NewsPUNE

बाबूजी आणि मी ‘ मधील सुमधूर गीतांनी रसिक मंत्रमुग्ध

पुणे : मराठी चित्रपटसृष्टी व संगीत क्षेत्रातील दिग्गज व्यक्तिमत्व सुधीर फडके अर्थात बाबूजी यांच्या अलौकिक प्रतिभेचा अविष्कार असलेली आणि गदिमा, सुधीर मोघे यांच्या सारख्या ख्यातनाम गीतकारांच्या लेखणीतून अजरामर झालेली गीते सुप्रसिद्ध गायक श्रीधर फडके यांनी सादर करीत रसिकांवर स्वरमोहिनी घातली. ‘बाबूजी आणि मी’ या कार्यक्रमात श्रीधर फडके यांनी अजरामर गाणी सादर करीत रसिकांना मराठी चित्रपटसृष्टीच्या सुवर्णकाळाची आठवण करून दिली.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळतर्फे गणपती मंदिराच्या ३९ व्या वर्धापनदिनानिमित्त गणेश कला क्रीडा मंच येथे संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवाच्या तिस-या दिवशी प्रख्यात गायक श्रीधर फडके व सहका-यांनी ‘बाबूजी आणि मी’ हा कार्यक्रम सादर केला.

देवत्वाचा अर्थ सहज सोप्या भाषेत मांडणारे गदिमा यांची ‘देव देव्हाऱ्यात नाही देव नाही…’ या भक्ती गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर ज्ञानेश्वर माऊलींची श्रीधर जींनी संगीतबद्ध केलेली रचना ‘देवाचिये द्वारी उभा क्षणभरी’ या गीताने वातावरण भक्तिमय केले.

बाबूजींची हिंदी रचना असलेले लता मंगेशकर यांच्या आवाजात प्रसिद्ध गीत ‘ज्योती कलश छलके’..हे गीत सादर झाले. श्रीधर फडके यांनी संगीतबद्ध केलेली समर्थ रामदास यांची रचना ‘माई मोरे नैनं श्याम सुरंग’ हे रामाशी एकरूप करणा-या रचनेला रसिकांनी भरभरून दाद दिली. यानंतर सुधीर मोघे यांनी लिहिलेले राम फाटक यांनी संगीतबद्ध केलेले ‘सखी मंद झाल्या तारका’ हे गीत कलाकारांनी सादर करून श्रोत्यांची मने जिंकली.

संगीत महोत्सव दि. ३० मार्च पर्यंत होणार असून यावर्षी पुण्यासह देशभरातील दिग्गज कलाकारांचे सादरीकरण हे महोत्सवाचे वैशिष्टय आहे. गणेश कला क्रीडा मंच येथे दररोज सायंकाळी ७ ते १० यावेळेत हे दिग्गज कलाकार आपली कला सादर करणार आहेत. महोत्सव रसिकांसाठी विनामूल्य खुला असून पुणेकरांनी मोठया संख्येने महोत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading