fbpx

श्रीराम जन्मोत्सवानिमित्त पं. समीर दूबळे यांनी केली गायनसेवा अर्पण

पुणे : अचपळ मन माझें नावरे आवरीता..तुजविण शिण होतो धांव रे धांव आता…राम माझे मनी राम माझे ध्यानी …शोभे सिंव्हासनी राम माझा’…सर्वात्मका सर्वेश्वरा गंगाधरा शिवसुंदरा अशी रामनामाची महती सांगणारे समर्थ रामदास यांच्या शब्दसामर्थ्याने भक्तीचा महिमा वर्णना-या, पं.जितेंद्र अभिषेकी यांनी संगीत दिलेल्या आणि पं.समीर दूबळे यांच्या स्वरांनी सजलेल्या शास्त्रीय गायनाने पेशवेकालीन तुळशीबाग राम मंदिराचा परिसर भक्तीमय झाला. मंदिरात उपस्थित भाविक आणि बहारदार गाण्याच्या सादरीकरणाने प्राचीन काळातील मंदिरात संगीत सभेची अनुभूती उपस्थितांनी घेतली.

श्री रामजी संस्थान तुळशीबाग च्यावतीने श्रीराम जन्मोत्सवानिमित्त तुळशीबाग येथील श्रीराम मंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये पं.समीर दूबळे यांनी गायनसेवा अर्पण केली. यावेळी संस्थानचे कार्यकारी विश्वस्त श्रीपाद चंद्रकांत तुळशीबागवाले, विश्वस्त राघवेंद्र तुळशीबागवाले, भरत तुळशीबागवाले, डॉ.रामचंद्र तुळशीबागवाले, कोटेश्वर तुळशीबागवाले, रामदास तुळशीबागवाले यांसह तुळशीबागवाले परिवार उपस्थित होता.

पं.समीर दूबळे यांनी बागेश्री रागाने कार्यक्रमाची सुरुवात केली. डॉ.अशोक रानडे यांनी संगीतबद्ध केलेले राग तोडीमधील कवी विठ्ठल बिडकर यांची रचना असलेले ‘स्वजन सखा राम माझा नेऊ नका वनी’ हे गीत सादर केले. यानंतर रामाची मातृरुपात कल्पना केलेला रामदास स्वामींचा ‘का हो राममाये’ या अभंगाला रसिकांनी उत्स्फूर्त दाद दिली. त्यानंतर समर्थ रामदास यांचाच अभंग ‘ध्यान करु जाता मन हरपले..सगूण ते झाले गुणातीत..राम माझे मनी राम माझे ध्यानी …शोभे सिंव्हासनी राम माझा’ हे पं. जितेंद्र अभिषेकी यांनी संगीतबद्ध केलेले भक्तिगीत त्यांनी गायले.

श्रीराम वनवास संपवून येत आहेत हे कळल्यावर अयोध्येची झालेली अवस्था त्यांनी ‘दिनानाथ हा राम येणार आहे’ या रचनेतून त्यांनी सादर केले. विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे…जितेंद्र अभिषेकी यांनी संगीत दिलेले भक्तीगीत सादर केले. समर्थ रामदास तळमळीने श्रीरामाला प्रार्थना करतात, अचपळ मन माझें नावरे आवरीता..तुजविण शिण होतो धांव रे धांव आता हे करुणाष्टक सादर केले.

ययाती आणि देवयानी या संगीत नाटकातील कुसुमाग्रजांचे गीत ‘सर्वात्मका सर्वेश्वरा गंगाधरा शिवसुंदरा जे जे जगी जगते तया माझे म्हणा करुणाकरा’ या नाट्यगीताने कार्यक्रमाची सांगता केली. तबल्यावर चारुदत्त फडके, हार्मोनियमवर अदिती गराडे, पखवाजवर आकाश तुपे यांनी साथसंगत केली. निलेश धाक्रस, मृदुला तांबे, रविराज काळे यांनी गायनाची साथ दिली.

Leave a Reply

%d bloggers like this: