fbpx
Friday, April 19, 2024
BusinessLatest News

अन्नधान्यातील स्वयंपूर्णतेसाठी राष्ट्र शास्त्रीजींचे ऋणी : कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर

नवी दिल्ली : विक्रम संवत २०८० च्या पहिल्याच दिवशी आलेल्या जागतिक जल दिन २०२३ निमित्त कृषी आणि शेतकरी कल्याणमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी माजी पंतप्रधान भारतरत्न स्वर्गीय लाल बहादूर शास्त्रीजी यांच्या नेतृत्वाचे कौतुक केले. पंतप्रधानांच्या निवासस्थानी शेती करण्यासाठी त्यांनी घेतलेल्या पुढाकारामुळे भारतीय शेतकर्‍यांना अन्नधान्य उत्पादनात स्वयंपूर्ण होण्याची प्रेरणा मिळाली, असे ते म्हणाले.

“शास्त्रीजींचे व्यक्तिमत्व अतुलनीय होते. अन्नधान्याचे संकट अत्युच्च पातळीवर असताना १९६५ मध्ये त्यांनी आपल्या शासकीय निवासस्थानी केवळ शेतीच केली नाही तर देशातील शेतकऱ्यांना ‘जय जवान, जय किसान’चा नारा देत शेतात जाण्याचे आवाहन केले जेणेकरून एक देश म्हणून आपण स्वावलंबी होऊ शकू आणि आपल्याला कधीही इतरांवर अवलंबून राहावे लागणार नाही. शास्त्रीजींप्रमाणेच आज लोक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अनुसरण करतात,” असे सांगून  तोमर यांनी पंतप्रधानांच्या आवाहनावर लोकांनी गॅस सबसिडी कशी सोडली याचे उदाहरण दिले.

जागतिक जल दिन २०२३ निमित्त धनुका समूहाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात तोमर बोलत होते. तोमर यांनी स्व. पंतप्रधान लाल बहादूर शास्त्रीजी यांच्या नव्याने बनवलेल्या पोर्ट्रेटचे अनावरण केले. तसेच त्यांचे नातू संजयनाथ सिंह यांनी लिहिलेल्या त्यांच्या चरित्र पुस्तिकेचे अनावरण केले. ‘भारतरत्न’ स्वर्गीय लाल बहादूर शास्त्रीजी यांचे चिरंजीव अनिल शास्त्री, नातू सिद्धार्थनाथ सिंह आणि विभाकर शास्त्री, शास्त्रीजींच्या सून आणि धनुका ग्रुपचे अध्यक्ष आर. जी. अग्रवाल आदि कुटुंबीय यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.

केंद्रीय ग्रामीण विकास आणि पंचायती राजमंत्री गिरीराज सिंह; राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे अध्यक्ष विजय सांपला; माजी केंद्रीय मंत्री डॉ. हर्षवर्धन, खासदार वीरेंद्र सिंह आणि राजेंद्र अग्रवाल; एम्सचे संचालक डॉ. एम. श्रीनिवास; कृषी आयुक्त पी. के. सिंह; डीएआरईचे माजी सचिव आणि आयसीएआरचे महासंचालक डॉ. आर.एस. परोडा; ऑल इंडिया ट्रेडर्स कॉन्फेडरेशनचे राष्ट्रीय उपाध्यक्ष सत्यभूषण जैन आणि भारतीय विकास परिषदेचे सुरेश जैनआदी शास्त्रीजींच्या पोर्ट्रेटच्या अनावरण प्रसंगी उपस्थित होते.

या कार्यक्रमापूर्वी आयसीएआर-आयएआरआय, नवी दिल्लीचे सहसंचालक (विस्तार) डॉ. रवींद्रनाथ पडारिया, धनुका समूहाचे अध्यक्ष आर. जी. अग्रवाल आणि अखिल भारतीय शेतकरी संघटनेचे कार्याध्यक्ष व शास्त्रीजींचे नातू संजयनाथ सिंह आणि यांनी संयुक्तपणे पत्रकार परिषदेला संबोधित करून जलसंधारणाचे महत्त्व अधोरेखित केले.

धनुका समूहाचे अध्यक्ष आर. जी. अग्रवाल म्हणाले, भारतात ७० टक्के ते ८० टक्के पाणी हे शेतीसाठी वापरले जाते, असा अंदाज आहे. भूजल पातळी सातत्याने कमी होत आहे त्यामुळे पारंपरिक सिंचन तंत्राऐवजी ठिबक आणि स्प्रिंकलर सिंचन तंत्राला चालना देण्याची नितांत गरज आहे. अशा काटेकोर सिंचन व्यवस्थेमुळे, ६० टक्के पेक्षा जास्त पडीक जमीन असलेले इस्राएलसारखे देश जागतिक कृषी क्षेत्रातील उच्च-गुणवत्तेची आणि उच्च-उत्पादक पिके घेणारे आघाडीचे देश म्हणून समृद्ध होऊ शकले आहेत. आपल्याला एक देश म्हणून काटेकोर शेतीचा मोठ्या प्रमाणात अवलंब करणे गरजेचे आहे. त्यातून पिकाची गुणवत्ता, उत्पादन आणि नफा वाढून सोबतच पाण्याची बचत होईल.

आयसीएआर-आयएआरआय, नवी दिल्लीचे सहसंचालक (विस्तार) डॉ. रवींद्रनाथ पडारिया म्हणाले, गेल्या ३० वर्षांमध्ये आपल्या पीक पद्धती, पीक लागवडीचे तंत्र आणि आपली प्राधान्ये ही पाणी-केंद्रित झाले आहेत. हा दृष्टीकोन बदलणे आवश्यक आहे आणि आपली पीक पद्धती बदलण्याची हीच योग्य वेळ आहे. याचा फायदा शेतकऱ्यांसोबतच सर्व भागधारकांना होईल.

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading