fbpx

पुणेकरांना घडले मराठी मातीच्या सांस्कृतिक परंपरेचे दर्शन

पुणे : माझ्या मराठी मातीचा लावा लल्लाटास टिळा… या मराठी भाषेचा गोडवा सांगणा-या गीताच्या सादरीकरणाने प्रख्यात गायक नंदेश उमप आणि सहका-यांनी पुणेकरांची मने जिंकली. जात्यावरच्या ओवीपासून ते वासुदेव आणि गोंधळ ते पोवाड्यापर्यंतचा सांगीतिक प्रवास अनुभवीत रसिकांना ‘नंदेश उमप रजनी’ या कार्यक्रमातून मराठी मातीच्या सांस्कृतिक परंपरेचे दर्शन घडले.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळतर्फे गणपती मंदिराच्या ३९ व्या वर्धापनदिनानिमित्त गणेश कला क्रीडा मंच येथे संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवाच्या दुस-या दिवशी गायक नंदेश उमप व सहका-यांनी ‘नंदेश उमप रजनी’ हा कार्यक्रम सादर केला.

कार्यक्रमाची सुरुवात गणराज रंगी नाचतो… या गणरायाची स्तुती करणा-या गीताने झाली. लोकनाट्य हा मराठी संस्कृतीचा अविभाज्य भाग. त्याला वेगळी उंची मिळवून दिली, ती लोकशाहीर विठ्ठल उमप यांनी. त्यामुळे त्यांनी लिहिलेला सात सुरांचा सूत्रधार, छुमछुम नाचत ये ओंकारा… हा गण नंदेश उमप यांनी सादर करताच रसिकांनी भरभरून दाद दिली. तसेच कार्यक्रमात शाहीर साबळे यांना देखील गीतांतून मानवंदना देण्यात आली. मराठी संस्कृतीचा वसा सांगणा-या गीतांच्या सादरीकरणाने उत्तरोत्तर कार्यक्रम रंगत गेला.

संगीत महोत्सव दि. ३० मार्च पर्यंत होणार असून यावर्षी पुण्यासह देशभरातील दिग्गज कलाकारांचे सादरीकरण हे महोत्सवाचे वैशिष्टय आहे. गणेश कला क्रीडा मंच येथे दररोज सायंकाळी ७ ते १० यावेळेत हे दिग्गज कलाकार आपली कला सादर करणार आहेत. महोत्सव रसिकांसाठी विनामूल्य खुला असून पुणेकरांनी मोठया संख्येने महोत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: