fbpx

कथाबीज उत्तम असेल तरच आशय वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचतो : प्रसाद मिरासदार

पुणे : तंत्रज्ञानामुळे प्रकाशन विश्वात बदल घडतो आहे. ई-बुक या दृक-श्राव्य माध्यमामुळे लेखकाच्या भावना अधिक उत्कटपणे वाचकांपर्यंत पोहोचतात, परंतु मूळ कथाबीज उत्तम असेल तरच कथेचा आशय वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचतो, असे प्रतिपादन स्टोरी टेलचे भारतातील सल्लागार प्रतिनिधी प्रसाद मिरासदार यांनी केले. आर्टिफिशिअल इंन्टेलिजन्सच्याद्वारे कंटेट तयार करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून त्याची चुणूकही दिसायला लागली आहे. युवा पिढीने या तंत्रज्ञानाशी मैत्री केल्यास लेखक आणि तंत्रज्ञांसाठी नवे दालन खुले होईल, असेही त्यांनी सूचित केले.
मराठी नववर्ष दिनानिमित्ताने कथा बाय स्नेहल बाकरे आणि झंकार स्टुडिओ पब्लिशिंगतर्फे ‘ब्लॉक ते ब्लॉग’ हा 11 मराठी कथांचा अक्षरोत्सव गुरुवारी हॉटेल आशिष प्लाझा येथे आयोजित करण्यात आला. या वेळी प्रसाद मिरासदार प्रमुख पाहुणे होते. त्या वेळी ते ‘प्रकाशन व्यवसायाचे ग्लोबल स्वरूप’ या विषयी बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दिलीपराज प्रकाशनचे संचालक राजीव बर्वे होते. झंकार स्टुडिओचे संचालक सत्यजित पंगू, स्नेहल बाकरे, सुनिता ओगले व्यासपीठावर होते. कथा अक्षरोत्सवात सुनिता ओगले लिखित ‘मैत्रीण’ या ऑडिओबुकचे प्रकाशन आणि या पुस्तकातील ‘अण्णा माझे चुकले का? या कथेचे अभिवाचन करण्यात आले.
मिरासदार पुढे म्हणाले, जगभरात घडणाऱ्या अनेक घटनांमध्ये समानता आढळते कारण मानवी भावना सर्वदूर त्याच असतात. स्थानिक गोष्ट जागतिक होते फक्त त्याची अभिव्यक्ती बदलत असते. यासाठी व्यक्त होण्याचे धाडस झाले पाहिजे. आधुनिक काळात सेल्फ पब्लिशिंग आणि ई-बुक अशा माध्यमातून लेखक वाचकांपर्यंत सहजनेते पोहोचू शकतात.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना राजीव बर्वे म्हणाले, साहित्य कोणत्याही मार्गाने वाचकापर्यंत पोहोचले पाहिजे. लेखन हे व्यक्त होण्याचे साधन आहे. तंत्रज्ञानाचा पुस्तकांवर परिणाम झाला तरी मुद्रित पुस्तकाला मरण नाही. सामान्य माणसाच्या मनात न येणाऱ्या कल्पना लेखकाच्या मनात येतात हे त्याचे वैशिष्ट्य असते. ई-बुक अथवा ऑडिओ बुकच्या माध्यमातून साहित्य प्रकाशित झाल्यामुळे छापिल पुस्तकांचाही खप वाढत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे सर्व तंत्रज्ञाने एकमेकांच्या हातात हात घालून पुढे जात आहेत.
मैत्रिण ऑडिओबुकविषयी सुनीता ओगले यांच्याशी सोनल चौबळ यांनी संवाद साधला. वाचनामुळेच लेखनाची आवड निर्माण झाल्याचे सांगून ओगले म्हणाल्या, आपल्या आसपास घडणाऱ्या घटनांमधून लेखकाला कथाबीज सापडते. ब्लॉगद्वारे लिहिते होत आहेत त्यांनी आपल्या लिखाणाला कथेचे रूप द्यायचा प्रयत्न करावा. यासाठी वाचनसंस्कार आणि अभ्यास होणे गरजचे आहे. संजय डोळे, प्रियांका गोगटे, अभिजित पोतनीस, शितल जोशी, उदय थत्ते, वंदना गरगटे यांनी अभिवाचन केले.
प्रास्ताविक झंकार स्टुडिओचे संचालक सत्यजित पंगू यांनी केले. सूत्रसंचालन स्मिता कुलकर्णी यांनी केले.

Leave a Reply

%d bloggers like this: