fbpx

स्त्री शिक्षणाची गुढी  उभारत शोभायात्रेत झाला महिला शक्तीचा जागर

पुणे :  ढोल ताशांचा गजर, सनई चौघडांचा नाद, फुलांची उधळण, छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय श्रीराम च्या घोषणा, पारंपारिक वेशामध्ये सहभागी झालेले स्त्री-पुरुष आणि लहान मुले अशा चैतन्यमय वातावरणात स्त्री शक्तीचा जागर करत हिंदुत्व दिन सोहळा समितीतर्फे भव्य शोभायात्रा काढण्यात आली.

हिंदुत्व दिन सोहळा समिती आणि सकल हिंदू समाज यांच्या वतीने कोथरूड मधील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथून भव्य शोभायात्रा काढण्यात आली. माजी  महापौर मुरलीधर मोहोळ, माजी आमदार चंद्रकांत मोकाटे, रवींद्र वंजारवाडकर, माजी नगरसेवक दीपक पोटे, मंजुश्री खर्डेकर, संदीप खर्डेकर, माजी नगरसेवक सुशील मेंगडे, जयंत भावे, योगेश मोकाटे यांच्यासह  ह.भ.प. चंद्रकांत  वांजळे महाराज,ह.भ.प. धर्मराज हांडे महाराज ,अनिलराव व्यास, शशिकांत सुतार, आशिष कांटे, तुषार कुलकर्णी, शशांक मेंगडे, जगन्नाथ कुलकर्णी, सीताराम खाडे, अनंत शिंदे, ईशानी खिरे, श्रध्दा लाळे, अनुराधा एडके शुभम राजपूत , निलेश कोंढाळकर, जितेंद्र गाडे आदी शोभायात्रेमध्ये सहभागी झाले होते.

उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते स्त्री शिक्षणाची गुढी उभारून या शोभायात्रेचा प्रारंभ करण्यात आला. यानंतर छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आले. कष्टकरी पाच महिलांचा चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते यावेळी सत्कार करण्यात आला.

चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘मनुष्य सेवा हीच ईश्वर सेवा’ आहे ही हिंदू धर्माची सर्वात मोठी शिकवण आहे. समाजातील पीडित आणि वंचित घटकांना मदत करून त्यांना समाजाच्या विकासामध्ये सहभागी करून घेणे हा संकल्प केला पाहिजे. राज्याचा उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री म्हणून महिला शिक्षणाला अधिक प्राधान्य देण्यात येणार आहे. गाव खेड्यामध्ये आणि वाड्यावर वस्त्यांमध्ये  तळागाळापर्यंत शिक्षणाची गंगा पोहोचली पाहिजे, यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. समाजातील एकही स्त्री शिक्षणापासून वंचित राहिली नाही पाहिजे, हा हिंदू नववर्षानिमित्त संकल्प करण्यात येत आहे.

शोभायात्रा भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे चौकामध्ये पोहोचल्यानंतर विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी मर्दानी खेळांची यावेळी प्रात्यक्षिके सादर केली. छत्रपती शिवाजी महाराज, राणी लक्ष्मीबाई, राजमाता जिजाऊ यांच्या वेशभूषा परिधान केलेल्या विद्यार्थिनींनी विशेष लक्ष आकर्षित करून घेतले. शोभायात्रेमध्ये प्रभू श्रीराम छत्रपती शिवाजी महाराज यांचे भव्य पुतळे सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. खिलारेवाडी तरुण मंडळाने शोभायात्रेचे भव्य स्वागत व समारोप केला.

कोथरूड मधील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथून सुरू झालेली ही भव्य शोभायात्रा करिष्मा सोसायटी, गुळवणी महाराज रोड, मेहंदळे गॅरेज मार्गे खिलारेवाडी येथे संपन्न झाली.

रा स्व संघ, विश्व हिंदू परिषद, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, हिंदू जागरण मंच, महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था, संकल्प प्रतिष्ठान, शाहू लक्षणे क्रीडा अकॅडमी, ब्रह्मविद्या प्रतिष्ठान, श्रीरामराज्य प्रतिष्ठान, संस्कृती प्रतिष्ठान या संस्थांनी सहभाग घेतला.

Leave a Reply

%d bloggers like this: