fbpx

शास्त्रीय गायनासह मराठी रचनांनी सजली ‘सुश्राव्य साधना’

पुणे : पुरिया धनाश्री रागातील पायलिया झनकार मोरी… रचनेने झालेली सुरुवात, त्यापाठोपाठ पं. वसंतराव देशपांडे यांनी गायलेली बिंदिया ले गयी हमार मचरिया… या पारंपरिक रचनेचे सादरीकरण करून प्रख्यात गायक राहुल देशपांडे यांनी पुणेकरांची वाहवा मिळविली. शास्त्रीय गायनासह मराठी रचनांच्या सादरीकरणाने ‘सुश्राव्य साधना’ ही स्वर मैफल सजली.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळतर्फे गणपती मंदिराच्या ३९ व्या वर्धापनदिनानिमित्त गुढीपाडवा ते रामनवमी दरम्यान गणेश कला क्रीडा मंच येथे संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवाचे उद्घाटन पद्मश्री तालयोगी पं. सुरेश तळवळकर यांच्या हस्ते झाले. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष माणिक चव्हाण, उपाध्यक्ष सुनील रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सरचिटणीस हेमंत रासने, उत्सवप्रमुख अक्षय गोडसे, कुमार वाम्बुरे, अमोल केदारी, ऍड. प्रताप परदेशी, श्रीकांत शेटे, राजाभाऊ घोडके, प्रकाश चव्हाण, यतिश रासने, सौरभ रायकर आदी उपस्थित होते.
पं. सुरेश तळवळकर म्हणाले, गणरायाकडूनच आम्हा कलाकारांना प्रेरणा मिळते. पं. भीमसेन जोशी यांच्या दगडूशेठ गणपती समोर रस्त्यावर झालेल्या मैफलीत मी त्यांना साथ दिली होती. दगडूशेठ गणपती मंदिरात सात्विक समाधान मिळते. सर्वाना प्रेरणा देणारे हे गणरायाचे स्थान असल्याचे त्यांनी सांगितले. महेश सूर्यवंशी, हेमंत रासने यांनी मनोगत व्यक्त केले. अधिश पायगुडे यांनी सूत्रसंचालन केले.
संगीत महोत्सव दि. २२ ते ३० मार्च पर्यंत होणार असून यावर्षी पुण्यासह देशभरातील दिग्गज कलाकारांचे सादरीकरण हे महोत्सवाचे वैशिष्टय आहे. गणेश कला क्रीडा मंच येथे दररोज सायंकाळी ७ ते १० यावेळेत हे दिग्गज कलाकार आपली कला सादर करणार आहेत. महोत्सव रसिकांसाठी विनामूल्य खुला असून पुणेकरांनी मोठया संख्येने महोत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: