Wednesday, May 27, 2026
BLOGLatest News

गुढीपाडवा

हिंदु वर्षातला पहिला महिना म्हणजे चैत्र महिना. सूर्य जेव्हा मेष राशीमध्ये प्रवेश करतो, त्या वेळी भारतीय सौर चैत्र महिना सुरू होतो. वसंतऋतुचा प्रारंभ याच महिन्यापासून होतो. झाडाझुडपांना पालवी फुटून सगळीकडे हिरवेगार झालेले असते. या महिन्यातील चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून म्हणजे युगादि पासून सर्व सणांना आरंभ होतो.
नव्या वर्षांतला पहिला दिवस पहिला सण म्हणजे युगादि म्हणजे गुढीपाडवा. या दिवशी शालिवाहनशकाचे नवे वर्ष सुरू होते. यंदाच्या पाडव्याला शालिवाहन शक 1945 सुरु होत असून ‘शोभन‘ नावाच्या संवत्सराची सुरुवात होत आहे. साडेतीन मुहूर्तातील एक मुहूर्त म्हणजे गुढीपाडवा.

नव्या गोष्टींचा आरंभ पाडव्याला करता येतो. या दिवशी नवीन कामांना सुरुवात करणे आध्यात्मिकरित्या शुभ मानले जाते. पाडव्याच्या दिवशी सुरु केलेली कामे यशस्वी होतात असे मानले जाते.

ब्रह्मपुराणानुसार जेव्हा ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली तो दिवस गुढीपाडव्याचा होता आणि त्याच वेळी सत्ययुगाची सुरुवात झाली. त्यामुळे या पाडव्याला आध्यात्मिक महत्व देखील आहे.

राम ज्या दिवशी आपला वनवास संपवून आणि रावणाचा पराभव करून अयोध्येत परत आले त्यावेळी प्रजेने त्यांचे गुढ्या, तोरणे आणि ध्वज उभारून स्वागत केले आणि तो दिवस युगादि पाडव्याचा होता असे मानले जाते.
या दिवशी पहाटे लवकर उठुन अभ्यंगस्नान करावे व कडुलिंबाची पाने, ओवा, जिरे, चिंच, गुळ, हिंग घालून हे अमृतप्राय मिश्रण भक्षण करावे ज्यायोगे आरोग्यप्राप्ती होते असे शास्त्र सांगते. या दिवशी गुढीबरोबरच पंचांगाचे पूजन करतात. याच दिवशी वासंतीय देवी नवरात्रास तसेच श्रीरामांचे नवरात्राला सुरुवात होते. नवरात्राची घटस्थापना प्रात:काळी म्हणजे सूर्योदयापासून सकाळी 09:00 वाजेपर्यंत केव्हाही करता येईल.
या दिवशी जशी मनस्थिती ठेवाल तसे वर्ष जाते त्यामुळे या दिवशी मन प्रसन्न व आनंदी ठेवावे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक दिवस असल्याने सुवर्ण खरेदी, यंत्र खरेदी, वाहन खरेदी व कोणतेही काम सुरु करण्यास हा उत्तम दिवस मानला जातो.


– देशपांडे पंचांगकर्ते पं. गौरव देशपांडे
9823916297

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading