ओअॅसिस फर्टीलिटी, पुणे तर्फे शिरूर येथे महिला आरोग्य जागृती शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
पुणे : महिला आपल्या जीवनात महत्त्वाची भूमिका बजावतात पण अनेक जबाबदाऱ्या आणि बांधिलकींमुळे त्या त्यांच्या आरोग्याला कमीत कमी प्राधान्य देतात. महिलांच्या आहारातील लोहाच्या महत्त्वाविषयी जागरुकता निर्माण करण्यासाठी ओअॅसिस फर्टीलिटी, पुणेच्या वतीने पुणे ऑब्स्टेट्रिक अँड गायनॅकॉलॉजिकल सोसायटी (पीओजीएस) आणि वेदांत हॉस्पिटल, शिरूर यांच्या सहकार्याने महिला दिन साजरा करण्याचा एक भाग म्हणून खास महिलांसाठी ओअॅसिस फर्टिलिटी, पुणे येथील क्लिनिकल हेड आणि फर्टिलिटी स्पेशलिस्ट डॉ. नीलेश उन्मेश बलकवडे यांच्या नेतृत्वाखाली आरोग्य जनजागृती शिबिर आयोजित करण्यात आले होते.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मोरे, शिरूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी श्री. प्रसाद बोरकर, जिल्हा समुदाय संघटक कीर्ती तागड, तालुका समुदाय संघटक दीक्षा जेवुघाले आदी यावेळी उपस्थित होते.
प्रामुख्याने ग्रामीण भागातील महिलांना लोहाचे महत्त्व माहीत व्हावे, यासाठी आरोग्य जागृती शिबिर हा ओअॅसिस फर्टिलिटीने महिलांसाठी आयोजित केलेला उपक्रम होता. या शिबिरात अंगणवाडी सेविका, आशा सेविका, स्थानिक नगर परिषद कर्मचारी आणि आजूबाजूच्या गावांतील अनेक महिलांसह शेकडो महिला सहभागी झाल्या होत्या. त्या सर्वांच्या हिमोग्लोबिनच्या चाचण्या करून लोहाच्या गोळ्या वाटप करण्यात आल्या.
याप्रसंगी बोलताना ओअॅसिस फर्टिलिटी, पुणेचे क्लिनिकल हेड आणि फर्टिलिटी स्पेशलिस्ट डॉ. नीलेश उन्मेष बलकवडे म्हणाले, “लोह हे अत्यंत आवश्यक पोषक तत्व आहे कारण ते आपल्या शरीरात लाल रक्तपेशी निर्माण करण्यास मदत करते. विशेषत: स्त्रियांना लोहाची जास्त गरज असते कारण मासिक पाळी दरम्यान दर महिन्याला त्यांचे रक्त कमी होत असते. गर्भधारणेदरम्यान लोहाच्या कमतरतेमुळे अकाली मृत आणि कमी वजन इत्यादींसह इतर अनेक गंभीर गुंतागुंती निर्माण होऊ शकतात. या शिबिराच्या माध्यमातून आहारात लोहाचा समावेश करण्याबाबत जनजागृती करण्याचा आमचा मानस आहे”.