गुरुमाता अन्नपूर्णादेवी सांगत टाळ्यांची अपेक्षा न ठेवता सादरीकरण करा; उन्नती निश्चित होईल : नित्यानंद हळदीपूर
पुणे : मैफलीत समोर प्रेक्षक किती आहेत याचा विचार न करता, टाळ्यांची अपेक्षा न करता, निरपेक्ष भावनेने स्वत:साठी सादरीकरण करा त्यातून निश्चितच उन्नती होईल असा कानमंत्र गुरुमातेकडून मिळाला होता. पद्मभूषण अन्नपूर्णा देवी या माझ्यासाठी साक्षात देवीच होत्या. गुरुमातेचे वादन अत्यंत प्रभावी आणि दैवी होते, अशी भावना ज्येष्ठ बासरी वादक पंडित नित्यानंद हळदीपूर यांनी व्यक्त केली.
ऋत्विक फाउंडेशन फॉर परफॉर्मिंग आर्ट्सतर्फे स्वरानुभूती या उपक्रमाअंतर्गत पंडित नित्यानंद हळदीपूर यांच्या बासरीवादनाची मैफल ऋत्विक फाउंडेशन फॉर परफॉर्मिंग आर्ट्स येथे आयोजित करण्यात आली होती. त्या वेळी पंडित नित्यानंद हळदीपूर यांनी आपला सांगीतिक प्रवास उलगडून दाखविला. त्यांच्याशी सुदिप्तो मार्जीत यांनी संवाद साधला.
आध्यात्मिक कुटुंबात जन्मलेल्या नित्यानंद हळदीपूर यांना त्यांचे वडील निरंजन हळदीपूर यांच्याकडून बासरीवादनाची कला, तंत्र आणि सौंदर्यशास्त्राचे प्राथमिक मार्गदर्शन मिळाले. गुरू-शिष्य परंपरा आणि गुरुंकडून मिळालेल्या ज्ञानाविषयी बोलताना पंडित हळदीपूर म्हणाले, वडिलांनी मला माझ्या 9व्या वर्षी ख्यातकीर्त बासरीवादक पंडित पन्नालाल घोष यांच्याकडे नेले. कोवळ्या वयात विद्यार्थी सहजतेने विद्या आत्मसात करतात असे ते म्हणायचे. त्यांच्या मार्गदर्शनानंतर माझे वादन ऐकून माझ्यापेक्षा वयाने ज्येष्ठ शिष्य आश्चर्यचकित व्हायचे. गुरुजींच्या पहिल्या पुण्यतिथीदिनी मी ‘यमन’ राग सादर केला तेव्हा माझे सादरीकरण ऐकून अनेकांच्या डोळ्यात पाणी आल्याची आठवण त्यांनी सांगितली.
पद्मभूषण अन्नपूर्णादेवी यांनी नित्यानंद हळदीपूर यांना आपला शिष्य म्हणून स्वीकारल्यानंतर त्यांची प्रतिभा-संगीत फुलत गेले आणि त्यातूनच त्यांच्या वादनात उत्तरोत्तर परिपक्वता येऊ लागली. गुरू अन्नपूर्णादेवी यांच्याविषयी ते म्हणाले, त्यांचे वादन ऐकणे हे सुद्धा एक प्रकारचे शिक्षणच होते. त्यांचे वादन सहज-नैसर्गिक होते. कलेशी तादाम्य होऊन शिकता आले पाहिजे. कला ही स्वान्त:सुखाय असली पाहिजे, असे त्यांचे सांगणे असे.
पंडित नित्यानंद हळदीपूर यांनी मैफलीची सुरुवात राग मारवाने केली. त्यानंतर राग देस सादर केला. त्यांना प्रशांत पांडव यांनी तबला साथ केली. पंडित नित्यानंद हळदीपूर यांच्या सादरीकरणाने रसिकांची सायंकाळी संस्मरणीय ठरली. कलाकारांचे स्वागत ऋत्विक फाउंडेशनचे संस्थापक प्रवीण कडले आणि चेतना कडले यांनी केले.
स्वरानुभूती उपक्रमाअंतर्गत ख्यातकीर्त कलाकारांच्या मैफलीचे ऋत्विक फाउंडेशन येथे नियमित आयोजन केले जाते. कलाकारांचे गायन-वादन रसिकांसाठी पर्वणी ठरते. त्याच प्रमाणे युवा पिढीतील कलाकारांना ज्येष्ठ कलाकारांच्या सान्निध्यात राहून कलेविषयीचे मार्गदर्शन मिळते, असे ऋत्विक फाउंडेशनाच्या समन्वयक रश्मी वाठारे यांनी प्रास्ताविकात सांगितले.