अमन आणि अयान अली बंगश यांच्या सरोदवादनाने उपस्थित मंत्रमुग्ध
पुणे : ‘जरिया इंडिया’ या एनजीओमार्फत आयोजित ‘सरोद सिम्फनी’ हा अमन अली बंगश आणि अयान अली बंगश यांच्या सरोद वादनाचा कार्यक्रम दिमाखात पार पडला. जरिया या संस्थेकडून निधीसंकलनासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. जरिया या संस्थेच्या कुंती पवार, अपेक्षा शाह आणि रिचा भन्साळी या तीन मैत्रिणी संस्थापिका आहेत. गरजवंत व्यक्ती आणि दनशूर व्यक्ति यांच्यामधील दुवा म्हणजे ‘जरिया’! असं म्हणतात की, ‘दान करताना एका हाताचं दुसऱ्या हातालाही कळू नये…’ त्यामुळे या दोन हातांमधील दुवा होण्याचं काम जरिया ही एनजीओ करत आहे.
या कार्यक्रमात बासरी वादक दिपक भानुसे यांनी सुमधूर बासरीवादन करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. तर, अमन अली बंगश, अयान अली बंगश यांना साथ देण्यासाठी पद्मश्री विजय घाटे यांनी तबला वादन केले, श्रीधर पार्थसारथी यांनी मृदंगवादन केले तर ड्रम्सवर दर्शन दोशी यांची साथ लाभली.
या कार्यक्रमातून मिळालेल्या निधीतून उत्तम शिक्षण, पोषक आहार, वैद्यकिय प्रथमोपचार, कौशल्यविकास कार्यक्रम असे काही उपक्रम राबविण्यात येणार आहेत. इतक्या उत्तम उद्देशासाठी वादन करायला मिळाले, हे आम्ही आमचे भाग्य समजतो, अशी भावना अमन व अयान अली बंगश यांनी व्यक्त केली.
या कार्यक्रमासाठी दिनेश आगरवाल, राजन नवानी, ख्रिस्टीन खालसा, वर्षा तलेरा, अमित चोरडिया, श्रीनिवास बंन्सल यांची प्रमुख उपस्थिती होती. यापूर्वी जरिया संस्थेने समाजातील प्रतिकूल आर्थिक परिस्थिती असणारे घटक, ऑटिस्टिक मुले, एचआयव्हीग्रस्त रूग्ण, टाईप 1 मधुमेह रूग्ण अशा काही लोकांसाठी काम केले आहे.