भारताच्या अनिरुद्ध चंद्रशेखर व एन विजय सुंदर प्रशांत यांना दुहेरीचे विजेतेपद
पुणे : महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटनेच्या वतीने आयोजित पीएमआर ओपन एटीपी चॅलेंजर 100 पुरूष टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत एकेरीच्या उपांत्य फेरीत इटलीच्या चौथ्या मानांकीत लुका नार्डी याने चेक प्रजासत्ताकच्या पात्रता फेरीतून मुख्य फेरीत प्रवेश केलेल्या बिगर मानांकीत डॉमिनिक पालन याचा तर ऑस्ट्रेलीयाच्या तिस-या मानांकीत मॅक्स पर्सेल याने सर्बियाच्या मिलजान झेकिक याचा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला.
श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे बालेवाडी येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत एकेरीच्या उपांत्य फेरीच्या पहिल्या सामन्यात जागतिक क्रमवारीत 158 व्या स्थानी असलेल्या इटलीच्या चौथ्या मानांकीत लुका नार्डी याने चेक प्रजासत्ताकच्या पात्रता फेरीतून मुख्य फेरीत प्रवेश केलेल्या बिगर मानांकीत डॉमिनिक पालन याचा 7-6(4), 1-6, 7-5 असा पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली. हा सामना 2तास 15मिनीट चाललेल्या सामन्यात सुरुवातीला दोन्ही खेळाडूंनी आपापल्या सर्व्हिस राखल्या व 6-6 अशी बरोबरी निर्माण झाली. टायब्रेकमध्ये लुकाने आक्रमक खेळी करत सुरूवातीलाच 6-4 अशी आघाडी घेतली व आपली आघाडी कायम ठेवत पहिला सेट 7-6(4) असा जिंकून सामन्यात आघाडी घेतली. दुस-या सेटमध्ये लुकाला आपल्या खेळात सातत्य राखता आले नाही व याचाच फायदा घेत डॉमिनिक पालन याने चौथ्या व सहाव्या गेममध्ये लुकाची सर्व्हिस ब्रेक करत दुसरा सेट 6-1 असा जिंकून सामन्यात बरोबरी साधली. तिस-या व निर्णायक सेटमध्ये लुकाने आपल्या खेळात नवीन रणनीती खात सामन्यात पुनरागमन केले व तिसरा सेट 7-5 असा जिंकत सामन्यात विजय मिळवला.
उपांत्य फेरीच्या दुस-या लढतीत जागतिक क्रमांक 155 असलेल्या ऑस्ट्रेलियाच्या तिस-या मानांकीत मॅक्स पर्सेल याने अव्वल मानांकित खेळाडूवर सनसनाटी विजय मिळवणाऱ्या सर्बियाच्या मिलजान झेकिकचा 6-2, 6-3 असा सरळ सेटमध्ये पराभव करत सामन्यात विजय मिळवला. हा सामना 1तास 12मिनीटे चालला. पहिल्या सेटमध्ये मॅक्सने मिलजानची चौथ्या वआठव्या गेममध्ये सर्व्हेस ब्रेक करत पहिला सेट 6-2 असा तर दुस-या सेटमध्ये चौथ्या गेममध्ये सर्व्हिस ब्रेक करत दुसरा सेट 6-3 असा सहज जिंकत सामन्यात विजय मिळवत अंतिम फेरीत धडक मारली.
दुहेरीच्या विजेतेपदाच्या लढतीत 1तास, 11मिनीटे चाललेल्या सामन्यात भारताच्या अनिरुद्ध चंद्रशेखर व एन विजय सुंदर प्रशांत या बिगर मानांकीत जोडीने जपानच्या तोशिहिदे मत्सुई व काइतो उसुगी या पाचव्या मानांकीत जोडीचा 6-1, 4-6[10-3] असा पराभव करत दुहारीचे विजेतेपद पटकावले. पहिल्या सेटमध्ये पहिल्य, पाचव्या व सातव्या गेममध्ये तोशिहिदे मत्सुई व काइतो उसुगी यांची सर्व्हिस ब्रेक करत पहिला सेट 6-1 असा सहज जिंकत सामन्यात आघाडी घेतली. दुस-या सेटमध्ये खेळात सातत्य राखता न आल्याने अनिरुद्ध चंद्रशेखर व एन विजय सुंदर प्रशांत यांना दिसरा सेट 4-6 असा गमवावा लागला. सुपर टायब्रेकमध्ये अनिरुद्ध चंद्रशेखर व एन विजय सुंदर प्रशांत यांनी सुरूवातीपासूनच आक्रमक खेळाचे प्रदर्शन करत टायब्रेक 10-3 असा सहज जिंकत सामन्यात विजयासह दुहेरीचे विजेतेपद पटकावले.
दुहेरीतील विजेत्या अनिरुद्ध चंद्रशेखर व एन विजय सुंदर प्रशांत जोडीला करंडक, 7,590 डॉलर व 100 एटीपी गुण तर उपविजेत्या तो शिहिदे मत्सुई व काइतो उसुगी जोडीला करंडक, 4,400 डॉलर व 60 एटीपी गुण अशी पारितोषिके देण्यात आली. पारितोषिक वितरण एमएसएलटीएचे अध्यक्ष भरत ओझा, एमएसएलटीएचे मानद सचिव आणि स्पर्धा संचालक सुंदर अय्यर, राजीव देसाई यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी चॅलेंजर सुपरवायझर आंद्रे कॉर्निलोव्ह आदी मान्यवर उपस्थित होते.
स्पर्धेचा सविस्तर निकाल- मुख्य ड्रॉ- उपांत्य फेरी- एकेरी गट
लुका नार्डी (इटली) [4] वि.वि डॉमिनिक पालन (चेक प्रजासत्ताक) 7-6(4), 1-6, 7-5
मॅक्स पर्सेल (ऑस्ट्रेलिया) [3] वि.वि मिलजान झेकिक (सर्बिया) 6-2, 6-3
दुहेरी गट- अंतिम फेरी
अनिरुद्ध चंद्रशेखर/एन विजय सुंदर प्रशांत (भारत) वि.वि तोशिहिदे मत्सुई/काइतो उसुगी(जपान)(5)6-1, 4-6[10-3]