चिंचवड पोटनिवडणुकीत ५०.४७ टक्के मतदान
पिंपरी : 205 चिंचवड विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीसाठी आज शांततेत, सुरळीत आणि उत्साहाच्या वातावरणात मतदान पार पडले. नवोदित मतदारांसह युवक, युवती, पुरुष, महिला, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग तसेच इतर मतदारांनी आज आपला मताधिकार बजावला असुन या पोटनिवडणुकीसाठी ५०.४७ टक्के इतके सरासरी मतदान झाले, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सचिन ढोले यांनी दिली.
मतदान प्रक्रियेला सकाळी ७ वाजता सुरुवात झाली होती. सकाळी नऊ वाजेपर्यंत ३.२५ टक्के मतदान झाले. तर सकाळी ११ वाजेपर्यंत झालेल्या एकूण मतदानाची टक्केवारी १०.४५ टक्के, दुपारी १ वाजेपर्यंत २०.६८ टक्के, दुपारी ३ वाजेपर्यंत ३०.५५ टक्के एवढी आणि सायंकाळी ५ वाजेपर्यंत ४१.०६ टक्के इतकी होती. सायंकाळी 6 वाजेपर्यंत एकूण झालेल्या अंतिम मतदानाची सरासरी टक्केवारी ५०.४७ टक्के इतकी झाली. एकुणच संपूर्ण मतदान प्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली.
चिंचवड विधानसभा या मतदार संघामध्ये एकूण ५ लाख ६८ हजार ९५४ मतदार होते. त्यापैकी 2 लाख 87 हजार 145 एवढ्या मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला. त्यात 1 लाख 57 हजार 820 पुरुष तर 1 लाख 29 हजार 321 महिला आणि 4 इतरांनी मतदान केले. शहरातील एकूण ५१० मतदार केंद्रावर मतदान पार पडले. यापैकी मतदारसंघातील २५५ मतदान केंद्रावर वेबकास्टींगच्या सहाय्याने लक्ष ठेवण्यात आले होते.
या कक्षातून संपूर्ण मतदान प्रक्रियेवर तसेच यंत्रणेवर निवडणूक निर्णय अधिकारी सचिन ढोले लक्ष ठेवून होते. या कक्षामध्ये सहायक निवडणूक निर्णय अधिकारी अजित पाटील, शिरीष पोरेडी, शितल वाकडे, निवडणूक सहायक अधिकारी नागेश गायकवाड, माध्यम कक्षाचे नोडल अधिकारी किरण गायकवाड, निवडणूक सहायक अधिकारी प्रशांत शिंपी, थॉमस नरोन्हा, ईव्हीएम यंत्र व्यवस्थापन कक्षाचे समन्वयक बापू गायकवाड, पोस्टल मतदान कक्षाचे समन्वयक राजेश आगळे, समन्वयक सिताराम बहुरे, बेल इलेक्ट्रॉनीक्सचे तज्ज्ञ अधिकारी, डॅशबोर्ड कक्ष समन्वयक अनिता कोटलवार, विजय बोरुडे, नायब तहसीलदार श्वेता आल्हाट, संतोष सोनवणे यांच्यासह निवडणूक विभागाचे अधिकारी कर्मचारी, संगणक चालक कार्यरत होते. मतदान केंद्रावर दिव्यांगांना सहाय्य करण्यासाठी दिव्यांग कक्षाचे समन्वय अधिकारी श्रीनिवास दांगट यांनी कामकाज पाहिले.
