Thursday, May 28, 2026
Latest NewsPUNE

नदी स्वच्छ ठेवणे हे आपल्या सगळ्यांचे कर्तव्य – डॉ. संगीता बर्वे  

पुणेः- नदीच्या आरोग्याबाबत नवीन पिढीला शालेय जीवनापासूनच जागरूक करणे आवश्यक असून नदी हा विषय केवळ निबंधापुरता मर्यादित न राहता नदी स्वच्छ ठेवणे हे आपल्या सगळ्यांचे कर्तव्य आहे, असे मत प्रसिद्ध पर्यावरणप्रेमी लेखिका डॉ. संगीता बर्वे यांनी व्यक्त केले. 
किर्लोस्कर वसुंधरातर्फे हात घेण्यात आलेल्या रामनदी पुनरूज्जीवन अभियांतर्गत राम नदीच्या काठावरील २५ शाळांमध्ये वर्षभर केलेल्या अनेकविध उपक्रमांचा समारोप आणि बक्षिस वितरण सोहळा आज पर्यावरणप्रेमी लेखिका डॉ. संगीता बर्वे यांच्या हस्ते आज पाषाण येथील संत तुकाराम प्राथमिक विद्यालयात पार पडला, त्यावेळी त्या बोलत होत्या.  यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे विशेष अतिथी BSS Health &SCR OHC चे जनरल मॅनेजर डॉ. सुरेश मिजार, किर्लोस्कर वसुंधराचे संयोजक  वीरेंद्र चित्राव, पर्यवेक्षिका प्रतिभा खाडे, पाषाण येथील  संत तुकाराम प्राथमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका नंदा डोळास आणि स्मिता यादव, प्रभारी मुख्याध्यापक संजय घुले, अशोक उंडे, स्वच्छ वसुंधरा अभियानचे अनिल गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते. 
यावेळी बोलताना डॉ. संगीता बर्वे म्हणाल्या की, विद्यार्थी हे समाजाचे प्रतिनिधी आहेत. त्यामुळे नदी स्वच्छ ठेवण्याबाबत आपण सजग राहिले पाहिजे. माझी शाळा नदी किनारी होती, नदीकाठ हा देखील आमच्या शालेय शिक्षणाचा भाग झाला होता. नदीवर येणारे बगळे आणि इतर पक्ष्यांचे आम्ही निरीक्षण करायचो. नदी किनारी विकसीत होणारे जीवनचक्र देखील आम्ही जवळून अनुभवले आहे. 
यावेळी बोलताना डॉ. सुरेश मिजार म्हणाले की, बहुतांशी पुणेकरांना माहित नसणारी, सुमारे १९.२ कि.मी. लांबीची रामनदी सध्या अत्यंत वाईट अवस्थेत आहे. वर्पेवाडी, खाटपेवाडी, भुकुम, भुगाव, बावधन, सुतारवाडी, पाषाण, सोमेश्वरवाडी, बाणेर, औंध या मार्गाने ही नदी मुळा नदीला मिळते. भुकुम, भुगाव, बावधन अशा ३ ग्रामपंचायती रामनदीच्या काठावर असून बावधन ते औंध हा भाग पुणे महानगर पालिका क्षेत्रात येतो. दुर्लक्षित असलेल्या रामनदीचे पुनरूज्जीवन व्हावे आणि तिचा प्रवाह अविरल तसेच निर्मल व्हावा यासाठी शालेय विद्यार्थ्यांना नदी आणि पर्यावरण रक्षणासाठी प्रवृत्त करावे, या उद्देशाने ‘किर्लोस्कर वसुंधरा रामनदी अभियाना’ने नदीच्या काठावरील २५ शाळा दत्तक घेण्यात आल्या आहेत. सुमारे १.५ लाख शालेय विद्यार्थ्यांना नदी पुनरुज्जीवनास जोडण्याचा उपक्रम सुरु आहे.

यावेळी बोलताना किर्लोस्कर वसुंधराचे संयोजक वीरेंद्र चित्राव म्हणाले की, मुलांना राम नदीची ओळख करुन देणे, त्यांची विविध उपक्रमांद्वारे राम नदी विषयी आस्था निर्माण करणे व त्यांच्या माध्यमातून कुटूंबियांना देखील राम नदी पुनरुज्जीवन अभियानास सहभागी करुन घेणे हा आमचा उद्देश आहे. दृक् श्राव्य व्याख्याने, कार्यशाळा, वक्तृत्व स्पर्धा, राम नदीस पत्र, कचऱ्यातून कला, चित्रकला स्पर्धा इत्यादी अनेकविध उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांमध्ये आम्ही जागृती करण्याचा प्रयत्न या वर्षात केला आहे.

यावेळी डॉ. संगीता बर्वे यांनी नदीचे स्वच्छ, सुंदर आणि निर्मळ रूप उलगडून दाखविणाऱ्या स्वरचित कविता सादर केल्या. तसेच नदी स्वच्छ ठेवण्याबाबत विद्यार्थ्यांकडून सामुहिक प्रतिज्ञा म्हणून घेतली. स्वच्छ वसुंधरा अभियानचे अनिल गायकवाड यांनी वार्षिक उपक्रमांचा आढावा घेतला.  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विश्वास कदम यांनी केले. 
किर्लोस्कर वसुंधरा शाळा अभियान अंतर्गत घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांमधील विजेत्यांची नावे– वक्तृत्व स्पर्धा- प्रथम क्रमांक- वृषाली दिलीप पोटफोडे, इयत्ता ७ वी (म. न. पा. शाळा क्र. ११ जी सोमेश्वरवाडी), ‘राम नदीस पत्र’ स्पर्धा- प्रथम क्रमांक- गणेश दयानंद जाधव, इयत्ता ५ वी (म. न. पा. विद्यानिकेतन शाळा क्र. २०), वैभवी भिंगारे, इयत्ता ६ वी (म. न. पा. विद्यानिकेतन शाळा क्र. २०), सूरज सचिन भोसले, इयत्ता ७ वी, (म.न.पा. शाळा क्र. ५५ बी संत तुकाराम विद्यालय), तेजस्विनी सुधाकर डोंगरे, इयत्ता ८ वी (म.न.पा. शाळा क्र. ५४ जी सोमेश्वरवाडी), ‘माझी राम नदी’: चित्रकला स्पर्धा – प्रथम क्रमांक- यशस्वी जाधव, इयत्ता ४ थी (म.न.पा. शाळा ई-लर्निंग संत तुकाराम विद्यालय), प्रणाली विजय नवगिरे, इयत्ता ५ वी (म.न.पा. शाळा क्र. ७१ बी सुतारवाडी), राधिका पवार, इयत्ता ६ वी (म.न.पा. शाळा क्र. ८२ बी, बावधन), राही दत्तात्रेय सोनावणे, इयत्ता ७ वी (म.न.पा. शाळा क्र. १५३ बी बावधन), विजयालक्ष्मी सोमनाथ राठोड, इयत्ता ८ वी (म.न.पा. शाळा क्र. ५४ जी सोमेश्वरवाडी), कचऱ्यातून कला स्पर्धा: लहान गट ( इयत्ता ३ री ते ५ वी) प्रथम क्रमांक- इश्वरी काळे, इयत्ता ३ री (म.न.पा. शाळा क्र. ५४ जी सोमेश्वरवाडी), कचऱ्यातून कलाः मोठा गट ( इयत्ता ६ वी ते, ८वी)- प्रथम क्रमांक- राम कांबळे, इयत्ता ७ वी (म.न.पा. शाळा क्र. ५४ जी सोमेश्वरवाडी).

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading