Tuesday, June 16, 2026
ENTERTAINMENTLatest News

“पैचान कौन” फेम नवीन प्रभाकर यांचे मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण

लोकांना हसवणारा कलाकार हा हृदयाचा डॉक्टर असतो असं म्हणतात. गायक , अभिनेता आणि कॉमेडियन अशी आपल्या मनोरंजन क्षेत्रातील वाटचाल करून “पैचान कौन” म्हणणारी ‘जुली – द बार गर्ल’ आणि ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर’ मधून घराघरात पोहोचलेले नवीन प्रभाकर ह्यांची नव्याने ओळख करून देण्याची गरज नाही. लोकांना मनसोक्त हसवल्यानंतर आता मात्र “सोहम” च्यानिमित्ताने एका गंभीर भूमिकेत आपण नवीन प्रभाकर ह्यांना बघणार आहोत. सोहम मधली भूमिका हि काहीशी आऊट ऑफ द बॉक्स संधी नवीन प्रभाकर ह्यांच्यासाठी आहे आणि ती व्यक्तिरेखा निभावणे , भूमिकेला न्याय देणे हे नक्कीच आव्हानात्मक होते असे नवीन सांगतात.कृतांत सारख्या चित्रपटाचे दिग्दर्शन करणारे दत्ता मोहन भंडारे ह्यांचे दिग्दर्शन आणि संजय मंगेश बेहरे प्रदर्शित चित्रपट “सोहम” हि गुरुकुल शिक्षण पद्धतीवर अत्यंत सटीक मांडणी करणारी कथा आहे. गुरुकुल पद्धती कालबाह्य जरी झाली असली तरी ती शिक्षणाची किती प्रभावी पद्धत आहे ह्याचे उत्तम चत्रण ह्या चित्रपटाच्या निमित्ताने आपल्याला बघायला मिळणार आहे.

चित्रपटाबद्दल बोलताना नवीन प्रभाकर म्हणाले कि , “आताची शिक्षणपद्धती हि ‘लेकराच्या वजनाच्या भारोभार’ असा कारभार आहे. कोरोना महामारीच्या काळात शिक्षणाचे डिजिटायझेशन झाले खरे पण हे डिजिटल शिक्षण ‘शाप कि वरदान’ असा प्रश्न हि पडलाच. दीडशे वर्ष राज्य करून केवळ भारताची संपत्ती लुटून तर इंग्रज गेले नाहीत, इंग्रजी शिक्षणाची गोडी लावून गेले. इंग्रजी, हिंदी , मराठी मिडीयम च्या आधी गुरुकुल पद्धती होती जिथे विद्यार्थी ‘शिष्य’ आपल्या शिक्षकाकडे (गुरूंकडे) जाऊन १२ वर्ष शास्त्र, शस्त्र, विद्या आणि योग अभ्यास करत असत. आत्ता शिक्षणाचे जे इंग्रजीकरण झाले आहे हि खंत म्हणायला हरकत नाही कारण शेवटी तुम्ही काय शिकलात तुमच्यावर शिक्षणाने काय संस्कार झाले ते जास्त महत्वाचे आहे असे मला वाटते .”

चित्रपटाचे शूट करत असतानाचे अनुभव सांगताना नवीन म्हणतात , ” शूट करायला आम्ही जेव्हा सिद्धगिरी मठाला गेलो तेव्हा तिथली पद्धत बघून आम्ही फार अचंबित झालो. तिकडची जी खेळकर मुले आहेत , जे त्यांचं हसण्या बागडण्याचं वय आहे मैदानी खेळ खेळण्याचे दिवस आहेत त्यांना ते शिकवून त्यात कसे पारंगत व्हायचे किंवा एखाद्या विशिष्ट्य क्षेत्रात कसे प्राविण्य मिळवायचे मग ते कोणतेही क्षेत्र असो ह्याचे संस्कार त्या संस्थेत होताना आम्ही बघितले. काही मुली गुरुकुलात रांगेत जात असताना संस्कृत भाषेत भांडत होत्या.” एखादी भाषा तुम्ही शिकलात आणि अनेक दिवस, महिने त्याचा सरावंच केला नाही तर ती भाषा तुम्हाला काही काळाने येईनाशी होते. अर्थात एखादी भाषा शिकायची असेल तर त्याच भाषेत विचार करणे , बोलणे हि भाषा शिकण्याची सर्वोत्तम पद्धती आहे. शाळेतील शिक्षण हे संस्कार देत नाही , मुलांना उत्तम संस्कार देणे हि सर्वस्वी पालकांची जबाबदारी आहे, आणि केवळ शिक्षण म्हणजे संस्कार नाही. शिक्षण आणि संस्काराचा उत्तमोत्तम स्रोत त्या ठिकाणी बघायला अनुभवायला मिळेल म्हणून, कलाकार म्हणतात कि प्रत्येक मराठी माणसाने , आपल्या पाल्याला घेऊन एकदा तरी कण्हेरीच्या सिद्धगिरी मठाला भेट देऊन शिक्षण पद्धती खरोखरीच किती प्रभावी आणि कश्या प्रकारचं असावा ह्याचा अनुभव घेतला पाहिजेत.”

अदृश्य स्वामी काड सिद्धेश्वर महाराज आणि कोल्हापूरच्या कन्हेरी येथील अनेक विद्यार्थ्यांचे गुरुकुल असलेला सिद्धगिरी मठ अशी चित्रपटाची संकल्पना आहे. तिथे अनेक मुले विनाअनुदानित पद्धतीने शिकतात, अनेक कलांचा अभ्यास / सराव ते तिथे करतात. शिक्षण संपताच मुलांना विशिष्ट अशी रक्कम दिली जाते आणि त्यांनी स्वावलंबी बनावे ह्यासाठी योग्य त्या ठिकाणी त्यांना नोकरीची सुविधा सुद्धा दिली जाते. केवळ पुस्तकी ज्ञान नाही तर आयुष्यात अनेक कलागुणांना अंगिकारण्याचे महत्व त्यांना तिथे शिकवून , पटवून दिले आत आहे. चित्रपटातील पिता हे मठाधीश असतात , अत्यंत कटाक्षाने त्यांनी मठाचे नियम पद्धती अंगिकारलेली असते. आणि स्वामी म्हणताच आज आपला जो काही समज आहे त्याला फाटा देऊन खरोखरीच किती निस्वार्थ सेवाधारी एखादा मनुष्य असू शकतो त्यांच्या कडून आपल्याला कित्तेक गोष्टी शिकायला मिळतात अशी ती पित्ताची प्रतिमा साकारली गेली आहे. दुसरीकडे मुलगा (नवीन प्रभाकर) हा इंजिनियर असतो तो एका प्रतिष्ठित ठिकाणी नोकरी करतो आणि जेव्हा तो घरी जातो तेव्हा त्याच्या मुली आणि पत्नी त्याचे छान कुटुंब असा व्यक्ती चित्रित करण्यात आलं आहे. मुलाच्या पालकांना सुद्धा मुलाचे फार कौतुक असते परंतु पुस्तकी आणि बाहेरच्या शिक्षणपद्धतीचा प्रभावात असलेला इंग्रजी वातावरणात वावरणारा मुलगा, त्याला त्याच्या पित्याचे मठात जाणे किंवा तिथल्या पद्धती आचरणात आणणे हे न पटणारे असते. एकदा मात्र मुलीच्या हट्टापायी जेव्हा त्याला मठात जाण्याचा प्रसंग येतो आणि तिथे गेल्यावर त्या मठाचे आचार विचार तिथली पद्धती जेव्हा तो बघो तेव्हा त्याला सुद्धा मठाच्या शिक्षणपद्धतीचा विचार पटतो आणि तो त्या शिक्षणाचा समर्थक बनतो. त्याच क्षणी मुलगा त्याच्या वडिलांचे जाऊन पाय धरतो आणि त्यांना चुकीचे ठरविण्यासाठी त्यांची माफी मागतो.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading