आधी अपात्रतेचा निर्णय व्हावा, मग पक्ष चिन्हांचा – उद्धव ठाकरे
मुंबई : बंडखोर आमदारांच्या अपात्रतेबाबत सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागल्यानंतरच केंद्रीय निवडणूक आयोगाने धनुष्यबाण कुणाचा?, यावर निर्णय घ्यावा, अशी महत्त्वपूर्ण मागणी आज उद्धव ठाकरे यांनी केली.
तसेच, निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षप्रमुख पदाची निवडणूक घेऊ द्यावी, असेही आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले. उद्धव ठाकरे यांच्या पक्षप्रमुख पदाचा कार्यकाळ २३ जानेवारी रोजी संपुष्टात आला आहे. आज ‘मातोश्री’ येथे उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषदेत आपली भूमिका स्पष्ट केली आणि शिंदे गटावर पुन्हा जोरदार हल्ला चढवला.
उद्धव ठाकरे म्हणाले, राज्यात शिवसेना एकच आहे. केवळ निवडून आलेले लोकप्रतिनिधी म्हणजे पक्ष नसतो. शिवसेनेची एक घटना आहे. त्या घटनेवर पक्ष चालतो. केवळ निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींवर पक्षाचे भवितव्य ठरत असेल तर उद्या कुणीही पैशांच्या जोरावर लोकप्रतिनिधींना खरेदी करू शकतो. यामुळे लोकशाहीचा बाजार होऊ शकतो. निवडणूक आयोगाने असा बाजार होण्यापासून लोकशाहीला वाचवणे गरजेचे आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले, निवडणूक आयोगाने मागणी केली त्याप्रमाणे आम्ही लाखो सदस्यांची प्रतिज्ञापत्रं सादर केली आहेत. केवळ गद्दारांनी दावा केला म्हणून पक्ष गोठवू नये. किमान आता तरी घटनेनुसार पक्षप्रमुख पदाची निवडणूक घेण्यास निवडणूक आयोगाने मान्यता द्यावी. शिवसेना कुणाची? यावर दिल्लीतील दोन दरबारात सध्या सुनावणी सुरू आहे. दिल्लीत तसे अनेक दरबार आहेत. मात्र, शिवसेनेबाबत सर्वोच्च न्यायालयात आणि निवडणूक आयोग या दोन दरबारांत सुनावणी सुरू आहे. सर्वोच्च न्यायालयात १४ फेब्रुवारीपासून सलग सुनावणी होणार आहे.
तर, निवडणूक आयोगापुढील सुनावणी पूर्ण झाली असून लवकरच आयोग निर्णय देण्याची शक्यता आहे. मात्र, आमची निवडणूक आयोगाला विनंती आहे की, आधी बंडखोर आमदारांच्या अपात्रतेबाबत सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येऊ द्यावा. निवडणूक आयोगाने आमच्याविरोधात निकाल दिला आणि नंतर सर्वोच्च न्यायालयाने गद्दारांना अपात्र ठरवले तर घटनात्मक पेच निर्माण होऊ शकतो. त्यामुळे आधी बंडखोर आमदारांच्या अपात्रतेबाबतचा निकाल येऊ द्यावा. त्यानंतरच निवडणूक आयोगाने धनुष्यबाण कुणाचा?, यावर निकाल द्यावा.
