Wednesday, May 27, 2026
Latest NewsPUNE

संविधान टिकण्यासाठी सामाजिक चळवळ उभी रहावी : रमेश बागवे

पुणे : समाजात धोकेबाज लोकांची संख्या वाढत चालली आहे. राजकीय पक्षांमध्ये गद्दारी वाढत चालली आहे. सामाजिक संतुलन बिघडत चालले आहे. संविधान टिकण्यासाठी सामाजिक चळवळ उभी राहिली पाहिजे, अशी अपेक्षा माजी मंत्री रमेश बागवे यांनी व्यक्त केली. महिलांनी महामाता रमामाई आंबेडकर यांच्या विचारांचा जागर केल्यास डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची जोपासना होईल, असेही ते म्हणाले.
महामाता रमामाई भीमराव आंबेडकर राष्ट्रीय स्मारक आयोजित महामाता रमाई महोत्सवाचा समारोप आज (दि. 7) रमाईरत्न पुरस्कार वितरण सोहळ्याने झाला. महामाता रमामाई यांच्या 126व्या जयंतीनिमित्त हा पुरस्कार एम. सी. ई. सोसायटीच्या अध्यक्षा अबेदा इनामदार आणि यशदातील संशोधन अधिकारी डॉ. बबन जोगदंड यांना बागवे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार अॅड. जयदेव गायकवाड होते. संमेलनाचे अध्यक्ष अॅड. प्रमोद आडकर, मुख्य समन्वयक विठ्ठल गायकवाड, स्वागताध्यक्ष लता राजगुरू, कुणाल बागवे, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त मोळक आदी विचारमंचावर होते.
रमेश बागवे म्हणाले, महामाता रमाई महोत्सव समाजाच्या सहभागातून होत आहे ही नाविन्यपूर्ण घटना आहे. पुरस्काराच्या माध्यमातून रमामाई यांचे विचार समाजापर्यंत पोहोचण्यास मदत होणार आहे. रमामाई यांना आयुष्यात अनेक संकटांना सामोरे जावे लागले पण आपले दु:ख, त्रास त्यांनी बाबासाहेब यांना कळू दिला नाही, हे त्यांचे मोठेपण आहे.
अॅड. जयदेव गायकवाड म्हणाले, देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर परिवर्तनाचे केंद्रबिंदू डॉ. बाबासाहेब आंबेडकर होते. त्यांनी आपल्या ज्ञानाचा उपयोग राष्ट्र घडविण्यासाठी केला. युगपुरुष घडविण्यात महामाता रमाई आंबेडकर यांचे मोठे योगदान आहे. असिम त्यागाची मूर्ती म्हणून रमाई यांच्याकडे पाहिले जाते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कष्ट सोसल्यामुळे आज अनेकांना गलेलठ्ठ पगाराच्या नोकऱ्या मिळाल्या आहेत पण डॉ. बाबासाहेब, रमाई यांच्या विचारांजा जेव्हा जागर होतो त्यावेळी ही मंडळी कुठे दिसत नाही, अशी खंत पुरस्काराला उत्तर देताना डॉ. बबन जोगदंड यांनी व्यक्त केली. सामान्य कार्यकर्त्यांमुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार पुढे नेण्याचे काम नेटाने सुरू आहे, अशा शब्दात त्यांनी महोत्सवाच्या आयोजनाबद्दल कौतुक केले.
अबेदा इनामदार म्हणाल्या, मुलांना उच्च शिक्षण देण्यासाठी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि रमाई आंबेडकर यांचे विचार समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रत्येक महिलेने प्रयत्न करायला हवेत. शिक्षणाशिवाय समृद्धी येणार नाही, असेही त्यांनी सूचित केले.
पुरस्कार वितरण सोहळ्यामागील भूमिका संमेलनाचे मुख्य संयोजक विठ्ठल गायकवाड यांनी प्रास्ताविकात मांडली. स्वागत आणि आभार लता राजगुरू यांनी मानले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading