Parbhani : अमरदीप रोडे खून प्रकरणातील चार आरोपींना जन्मठेप
परभणी : शिवसेना नगरसेवक अमरदीप रोडे यांच्या खून प्रकरणातील चार आरोपींना जिल्हा व सत्र न्यायालयाने आज (दि. ७ जानेवारी) रोजी आजन्म जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. या खून प्रकरणातील आरोपी रवि वसंत गायकवाड, किरण सोपानराव डाके, मीनाक्षी रवि गायकवाड, पार्वती विठ्ठल मोरे यांना ही शिक्षा ठोठावण्यात आली आहे.
या प्रकरणातील मृत्यू पावलेले अमरदीप रोडे व आरोपी रवि गायकवाड, किरण डाके हे एकमेकांचे जूने मित्र होते. आरोपी गायकवाड याच्या जायकवाडी वसाहतीतील घरासमोर नळास पाणी येत नव्हते. त्यामुळे त्यानी पाईपास छिद्र पाडून नवीन कनेक्शन घेतले. त्यामुळे वसाहतीमध्ये इतर नागरिकांना पाणी मिळत नव्हते. त्या भागातील महिलांनी मयत रोडे यांना महापालिका सदस्य म्हणून भेटून गायकवाड यांच्या कृत्याविषयी तक्रार केली. यावेळी मयत रोडे यांनी त्यांचे कनेक्शन बंद करू असे आश्वासन दिले.
तर आरोपी डाके मयत रोडे यांचे मित्र होते. रोडे यांनी त्यांच्या नावे काळया रंगाची स्कार्पिओ एम.एच.२२ ए.एम.४१७९ ही गाडी अमरदीप रोडे हे वापरत. परंतू गाडीचे हफ्ते रोडे हे डाके यास नियमितपणे देत होते परंतु, तो हफ्ते व्यवस्थित भरत नसल्याने त्यांच्यात वाद होता. या पार्श्वभूमीवर ३१ मार्च २०१९ रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास जायकवाडी वसाहतीतील नागरिक एकत्र आले असता यावेळी रोडे यांच्या गाडीतून त्या ठिकाणी हजर झाले. यावेळी त्यांचा या दोघा मित्रांबरोबर वाद झाला. यातून डाके याने त्याच्या घरातून कु-हाड आणली अन रोडे यांच्या मानेवर घाव घातला.
तसेच आरोपी गायकवाड याने घरात जावून तलवार आणली व रोडे यांना मारण्याचा प्रयत्न केला. रोडे यांनी तलवार हिसकावून घेवून वाकडी करुन फेकुन दिली. यावेळी डाके याने त्यांच्या हातातील कु-हाडीने रोडे यांना मारण्यास सुरुवात केली. जीव वाचविण्याकरीता पळत असताना रोडे तोल जावून नळाच्या पाण्याच्या खोल खड्ड्यात पडले. यावेळी डाके व गायकवाड या दोघांनी रोडे यांच्या डोक्यावर मोठमोठे दगड मारले. यात रोडे हे जागीच मृत्यू झाला होता. तर दोघे आरोपी तात्काळ स्वत:चा जीव वाचविण्याकरीता नवा मोंढा पोलिसांच्या स्वाधीन झाले होते.
या खळबळजनक प्रकारानंतर मोंढा पोलिसांनी तात्काळ आरोपींना ताब्यात घेवून घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. तत्कालीन पोलिस निरीक्षक रामेश्वर तट यांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. या खळबळजनक प्रकरणात राज्य सरकारनेही विशेष सरकारी वकील म्हणून ऍड. सुभाष उत्तमराव देशमुख हट्टेकर यांची नियुक्ती केली. जिल्हा व सत्र न्यायालयात या खटल्यात विशेष सरकार वकील देशमुख यांनी २५ साक्षीदारांची साक्ष नोंदविली.
दोन्ही बाजूंनी युक्तीवाद झाल्यानंतर जिल्हा व सत्र न्यायाधीश एन.जी. सातपुते यांनी या चौघा आरोपींना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. दरम्यान, जिल्हा पोलिस अधिक्षक श्रीमती आर. रागसुधा, अप्पर पोलिस अधिक्षक यशवंत काळे यांच्या मार्गदर्शनाखाली कौर्ट पैरवी अधिकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक कपील शेळके, पोलिस उपनिरीक्षक सुरेश चव्हाण, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक शिवाजी भांगे, कोर्ट पैरवी अंमलदार प्रमोद सूर्यवंशी व वंदना आदोडे यांनी काम पाहिले.
