fbpx

श्रद्धा-सुमन कार्यक्रमात गायन – नृत्य व वादनाचा त्रिवेणी आविष्कार

पुणे : महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालय व सुप्रसिद्ध तबलावादक पं. अरविंद कुमार आझाद यांच्या तालायन म्युझिक सर्कल संस्थेच्या वतीने ‘श्रध्दा सुमन’ या विशेष सांगितीक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर कार्यक्रम शनिवार २८ जानेवारी ते सोमवार ३० जानेवारी, २०२३ दरम्यान कर्वेरस्त्यावरील आबासाहेब गरवारे महाविद्यालयाच्या सभागृहात संपन्न होणार आहे. कार्यक्रमाची वेळ तीनही दिवस सायंकाळी पाच अशी असून, कार्यक्रमासाठी प्रथम येणा-यास प्राधान्य या तत्त्वावर विनामूल्य प्रवेश देण्यात येणार आहे.

आपले गुरु पं. किशन महाराज यांना आदरांजली वाहण्याच्या उद्देशाने मागील २८ वर्षे दरवर्षी पं.अरविंद कुमार आझाद हे ‘श्रद्धा सुमन’ या सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन करीत आहेत. सदर वर्ष हे पं. किशन महाराज यांचे जन्मशताब्दी वर्ष असून, त्यानिमित्ताने वर्षभर या कार्यक्रमाचे आयोजन केले जाणार आहे.

सप्टेंबर महिन्यापासून सुरू असलेल्या या कार्यक्रम श्रुखंलेतील हा पाचवा कार्यक्रम असणार असून सदर तीन दिवसीय विशेष सांगीतिक कार्यक्रम राज्याच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या विशेष सहकार्याने संपन्न होत आहे. राज्याचे सांस्कृतिक मंत्री मा.श्री.सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रेरणेतून संपन्न होत असलेल्या या कार्यक्रमासाठी संचालनालयाचे प्रधानसचिव  विकास खारगे आणि संचालक श्री.विभीषण चौरे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले आहे.

कार्यक्रमात पहिल्या दिवशी अर्थात शनिवार,दि. २८ जानेवारी रोजी पं.उल्हास कशाळकर यांच्या शिष्या व ग्वाल्हेर घराण्याच्या गायिका मंजुषा पाटील यांचे गायन होईल. त्यानंतर उस्ताद विलायत खान यांचे शिष्य आणि बनारस घराण्याचे प्रसिद्ध सतार वादक पं. नरेंद्र मिश्र यांचे सतार वादन होणार आहे. त्यानंतर सुप्रसिद्ध गायिका विदुषी आरती अंकलीकर – टिकेकर यांचे गायन होईल.

दुसऱ्या दिवशी अर्थात रविवार २९ जानेवारी रोजी स्वरयोगिनी पद्म विभूषण डॉ. प्रभा अत्रे यांच्या शिष्या व किराणा घराण्याच्या गायिका आरती ठाकूर- कुंडलकर यांचे गायन होईल. त्यानंतर पं. किशन महाराज यांचे शिष्य व बनारस घराण्याचे प्रसिद्ध तबलावादक सुखविंदर सिंग नामधारी यांचा अनोखा असा तबला आणि जोडीवादन कार्यक्रम होईल. जयपूर अत्रौली घराण्याच्या ज्येष्ठ शास्त्रीय गायिका विदुषी अश्विनी भिडे देशपांडे यांच्या गायनाने कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवसाची सांगता होईल.

तिसऱ्या व शेवटच्या दिवशी ( सोमवार, ३० जानेवारी ) बनारस घराण्याचे सुप्रसिद्ध कथक नर्तक विशाल कृष्ण यांचे सादरीकरण होईल. कृष्ण यांनी आपल्या आजी व प्रसिद्ध कथक नृत्यांगना राणी सितारा देवी यांच्याकडून नृत्याचे प्रशिक्षण घेतले आहे. ते आपल्या परिवारातील ११ व्या पिढीचे कलाकार आहे. त्यानंतर गानसम्राज्ञी पद्मविभूषण किशोरी अमोणकर यांचे शिष्य व जयपूर – अत्रौली घराण्याचे प्रसिद्ध गायक पं. रघुनंदन पणशीकर यांचे गायन होईल. पं. विजय राघव राव यांचे शिष्य व आंतरराष्ट्रीय ख्यातीचे बासरीवादक पं. रोणू मुजुमदार यांच्या बासरी वादनाने या तीन दिवसीय विशेष सांगीतिक कार्यक्रमाचा समारोप होणार आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: